तुमचे केस चाेरताेय ड्रॅगन! लाखाे नाेकऱ्यांवर गंडांतर; 'असे' हाेते नुकसान, वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 09:28 AM2023-07-14T09:28:39+5:302023-07-14T09:28:51+5:30
केसांचा व्यापार संकटात; निर्यातीला बसला फटका
नवी दिल्ली : भारतीयांच्या केसाचे अख्ख्या जगाला आकर्षण आहे. चीन, अमेरिका आणि युराेपियन देशांकडून भारतीयांच्या केसांची सर्वाधिक खरेदी हाेते. मात्र, अलिकडच्या काळात चीनमध्ये माेठ्या प्रमाणावर केसांची तस्करी हाेत आहे. तस्करीमुळे चीनी कंपन्या निम्म्यापेक्षा जास्त किंमतीत केस विकत घेत आहेत. परिणामी भारतातील केसांचा व्यापार संकटात आला आहे.
साडेपाच लाख नाेकऱ्या गेल्या
केसाच्या व्यापारात माेठ्या प्रमाणात अकुशल श्रमिक कामगारांची संख्या जास्त आहे. केसांना लांबी आणि जाडीच्या आधारे सरळ करून नीट पॅकिंग केले जाते. मात्र, तस्करीनंतर हे काम बांगलादेशात हाेते. परिणामी गेल्या तीन वर्षांमध्ये तेलंगणा, बंगाल, तामिळनाडू, राजस्थान या भागातील हेअर प्राेसेसिंग कारखाने बंद पडले. त्यामुळे सुमारे साडेपाच लाख भारतीयांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत.
...तर ३ अब्ज डाॅलरची कमाई
तस्करीमुळे नफा आणि कर संकलनावर परिणाम हाेत आहे. त्यामुळे तस्करी राेखल्यास देशाला सुमारे ३ अब्ज डाॅलर एवढे उत्पन्न
प्राप्त हाेऊ शकते.
असे हाेते नुकसान
२०० डाॅलर प्रति किलाेचा दर भारतीय केसांना मिळताे. तस्करीमुळे ६० ते ७० डाॅलर प्रति किलाेच्या दरात चीन कंपन्यांकडून खरेदी. बांगलादेश, म्यानमारमार्गे तस्करी हाेते. गेल्या दाेन वर्षांमध्ये निर्यात दुपटीने वाढली आहे. ४०० किलाे केस बांगलादेशात २०२१ मध्ये जप्त झाले हाेते.
ड्रॅगनची चलाखी
चिनी व्यापारी केसांच्या आयातीवर ३० टक्के शुल्क आणि कर वाचविण्यासाठी तस्करीचा मार्ग निवडतात. त्यांनी बांगलादेशात कारखाने सुरू केले आहेत. याचा फटका भारताला बसत आहे. म्हणूनच भारताने गेल्या वर्षी याबाबत कठाेर धाेरण अवलंबिले हाेते.
दक्षिण भारतात परंपरा
दक्षिण भारतात केस दान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सर्वाधिक संकलन या भागात हाेते. या केसांचा दर्जा उच्च असताे. त्यांना ‘रेमी हेअर’ या नावाने ओळखले जाते.