ईद आणि स्वातंत्र्य दिनी घातपाताचा कट, गुप्तचर यंत्रणांकडून हाय अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 10:07 PM2019-08-10T22:07:37+5:302019-08-10T22:14:08+5:30
सोमवारी (12 ऑगस्ट) बकरी ईद आणि बुधवारी (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन आहे.
नवी दिल्लीः बकरी ईद आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुंबई, दिल्लीसह देशभरातील 15 मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणाने (आयबी) वर्तविली आहे.
टीव्ही रिपोर्टनुसार, सोमवारी (12 ऑगस्ट) बकरी ईद आणि बुधवारी (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन आहे. या दिवशी मोठ्या घातपाताची शक्यता असल्याने तपास यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. गुप्तचर यंत्रणानेच्या इशाऱ्यानंतर मुंबई, दिल्लीसह देशभरातील 15 मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीर, पूर्वोत्तर भारतातील शहरे ही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. या ठिकाणी दहशतवादी मोठा हल्ला करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात येणारे कलम 370 रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असता येथील अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालजम्मू-काश्मीरमधील जनता, पोलीस आणि लष्काराच्या जवानांसोबत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेताना दिसत आहेत.