बुलंदशहरमधील हिंसाचाराचा मास्टरमाइंड अटकेत, आरोपी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 12:41 PM2018-12-04T12:41:17+5:302018-12-04T12:50:53+5:30
सोमवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामध्ये उसळलेल्या दंगलीमागच्या मुख्य सुत्रधाराला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.
लखनौ - सोमवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामध्ये उसळलेल्या दंगलीमागच्या मुख्य सुत्रधाराला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. या दंगलीप्रकरणी आतापर्यंत 75 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दंगलीतील मुख्य सुत्रधारासह तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या मुख्य सूत्रधाराचे नाव योगेश राज असून, तो प्रवीण तोगाडिया यांच्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. त्याच्यावर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना भडकवल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये योगेश राज याचे नाव आहे. योगेश राज याने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून जमावाला भडवले, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. योगेश राजसोबत उपेंद्र राघव (बजरंग दल), शिखर अग्रवाल ( माजी अध्यक्ष, भाजयुमो) यांची नावेही पोलीस अधिकारी सुबोध सिंह यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांमध्ये आहेत. दरम्यान, देवेंद्र, चमन आणि आशीष चौहान यांना अटक करण्यात आली आहे. बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंशाचे अवशेष आढळले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली होती.
27 people have been named by Police in FIR against violent protests which broke out after alleged cattle slaughter in #Bulandshahr . 60 unnamed people also mentioned in the FIR
— ANI UP (@ANINewsUP) December 4, 2018
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी जमावावर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि जाळपोळ केली. यात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच एक दंगलखोरही या हिंसाचारात मृत्युमुखी पडला.