दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी मास्टरप्लान, आदेश मिळताच केला जात आहे दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 01:08 PM2017-09-15T13:08:00+5:302017-09-15T13:09:19+5:30
काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी एक मास्टर प्लान तयार केला आहे. या मास्टर प्लानची अंमलबजावणी करत दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांना ठार केलं जात आहे
श्रीनगर, दि. 15 - काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी एक मास्टर प्लान तयार केला आहे. या मास्टर प्लानची अंमलबजावणी करत दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांना ठार केलं जात आहे. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटनेकडून ज्या दहशतवाद्यावर हल्ल्याची जबाबदारी सोपवली जात आहे त्याला हल्ल्याची तयारी करण्यासाठी वेळ मिळू नये यावर जास्त भर दिला जात आहे. ज्या दहशतवाद्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्या कमांडरला हालचाल करण्यासाठी वेळच दिला नाही, तर हताश होऊन चुकीचं पाऊल उचललं जाण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे जम्मू काश्मीर पोलिसांना स्थानिकांची पुर्ण मदत मिळत आहे. ज्यामुळे आत्मविश्वास उंचावला आहे.
दहशतवाद्यांविरोधात तयार करण्यात आलेला मास्टर प्लान यशस्वी होत असताना दिसत आहे. आकडेवारीवरुन सुरक्षा यंत्रणा आपली कामगिरी चोख बजावत असल्याचं दिसत आहे. अबू इस्माईलचा खात्मा केल्यासोबतच यावर्षी जम्मू काश्मीरमध्ये ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या 147 वर पोहोचली आहे. गतवर्षी एकूण 150 दहशतवादी मारले गेले होते. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी याचं संपुर्ण श्रेय जम्मू काश्मीर पोलिसांना दिलं आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी खब-यांचं जाळं पसरल्याने गुप्त माहिती मिळण्यात मदत होत आहे.
एका अधिका-याने सांगितलं आहे की, 'जम्मू काश्मीर पोलिसांनी गुप्त माहिती मिळवण्यासाठी' एक चांगलं नेटवर्क उभारलं आहे. मात्र दगडफेक आणि स्थानिक घटनांमुळे अनेकदा समस्या निर्माण होते. पोलिसांना आंदोलन करणा-यांचा सामना करण्यामध्येच वेळ खर्ची करावा लागतो. मात्र आता परिस्थिती बदलत आहे'.
जमावाकडून होणा-या हिंसेमध्ये घट झाल्याने जम्मू काश्मीर पोलिसांना दिलासा मिळाला आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस स्थानिकांची मोठ्या प्रमाणात मदत घेत आहे. गेल्या काही महिन्यात केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी गुप्त माहिती आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या खब-यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अनेक यशस्वी मोहिम केल्या आहेत. दहशतवाद्यांना तर आता फोन सर्व्हिलन्स वापरु नये असा आदेशच देण्यात आला आहे.
लष्कराने मोडलं दहशतवादाचं कंबरडं, भरती होणा-यांपेक्षा ठार होणा-या दहशतवाद्यांची संख्या जास्त
जम्मू काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या ठोस माहितीच्या आधारे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत दहशतवादाचं कंबरडं मोडण्यात यश मिळालं आहे. परिस्थिती तर अशी झाली आहे की, या वर्षात जितके दहशतवादी भरती झालेले नाहीत त्यापेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू काश्मीरात एकूण 71 दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. मात्र लष्कराने कारवाई करत एकूण 132 दहशतवाद्यांना ठार केलं आहे.
यावर्षी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून 78 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. गतवर्षी 2016 मध्ये हा आकडा एकूण 123 होता. दहशतवाद्यांची ही आकडेवारी पाहता काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचं प्रमाणही कमी झाल्याचंच दिसत आहे.
यावर्षी लष्कराने कारवाई करत ज्या 132 दहशतवाद्यांना ठार केलं, त्यामधील 74 विदेशी तर 58 स्थानिक दहशतवादी होते. यामधील 14 लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन आणि अल-बद्रचे टॉप कमांडर होते. राज्य पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवायांमध्ये मोठं यश हाती लागत असल्याचं दिसत आहे.
लष्कराची मोठी कारवाई, सहा महिन्यात 92 दहशतवादी ठार
काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली असून त्याचा प्रभावही दिसू लागला आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत जवानांनी जवळपास 92 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. 2016 मध्ये जुलैपर्यंतची आकडेवारी पहायला गेल्यास हा आकडा 79 इतका होता. दहशतवादी विरोधी कारवाईत यावर्षी खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 2012 आणि 2013 मधील वार्षिक आकडेवारीपेक्षाही जास्त आहे. त्यावेळी युपीए सरकार सत्तेत होतं.
लष्कराला मोठं यश
जम्मू काश्मीरमध्ये 2012 रोजी 72 तर 2013 मध्ये 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. एनडीएच्या कार्यकाळात 2014 मध्ये हा आकडा वाढून 110 वर पोहोचला. 2015 मध्ये एकूण 108, तर 2016 मध्ये 150 दहशतवादी मारले गेले. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार केल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2014 आणि 2015 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यापेक्षा थोडी कमी आहे". दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या चोख कारवाईचं श्रेय लष्कर, केंद्रीय दलं, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वयाचं आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितल्यानुसार, "सुरक्षा जवानांना खो-यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक दिली आहे.