नोटाबदलीची दलाली वकिलाला भोवणार
By admin | Published: December 30, 2016 01:49 AM2016-12-30T01:49:10+5:302016-12-30T01:49:10+5:30
दिल्लीतील एका लॉ फर्ममधून १३ कोटी रुपये जप्त केल्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) वादग्रस्त वकील रोहित टंडन यांना अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील एका लॉ फर्ममधून १३ कोटी रुपये जप्त केल्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) वादग्रस्त वकील रोहित टंडन यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अधिकारी टंडन यांची चौकशी करत होते. मनी लाँड्रिंग अॅक्ट अंतर्गत त्यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली त्यांना आता न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे.
या अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, कोलकाताचे व्यापारी पारसमल लोढा यांच्याशी हातमिळवणी करुन ६० कोटी रुपयांच्या बाद नोटा बदलण्यासाठी रोहित टंडनने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. याच प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून दिल्लीचे कोटक बँकेचे व्यवस्थापक आशीष कुमार यांनाही अटक करण्यात आली होती.
नोटाबंदीनंतर काळ्या पैशांशी संबंधित काही जणांना या तपास संस्थेने ताब्यात घेतले आहे. सीबीआयने चेन्नईतून रेड्डी यांना अटक केली. तर, ईडीने लोढा आणि आशीष कुमार यांना अटक केली होती.
दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा आणि आयकर विभाग यांनी याच महिन्यात दिल्लीत एका लॉ फर्ममधून १३.६ कोटी रुपये जप्त केले होते. या रकमेतील तब्बल दोन कोटी ६० लाख रुपयांच्या नव्या चलनातील नोटा होत्या. ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. रेड्डी यांचे प्रकरण चेन्नईचे आहे. यात आयकर खात्याने १४२ कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा शोध लावला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
लोढांच्या लॉकरमधून हिरे, माणिक केले जप्त
- अटक करण्यात आलेले व्यापारी पारसमल लोढा यांच्याविरुद्धच्या मोहिमेला गती देत सक्तवसुली संचालयाने (ईडी) कोलकात्यातून कथितरित्या लोढा यांच्या बँक लॉकरमधून हीरे, माणिक, दागिने जप्त केले. अलीपूर रोडवरील एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतील लॉकर ईडीच्या अधिकाऱ्यांनी उघडले.
- कोलकात्यातील दोन अन्य बँकातील लोढाचे दोन बँक लॉकर उघडले जाणे बाकी आहे. एजन्सीने २७ डिसेंबर रोजी कोलकात्यातून लोढा यांच्या दोन जागांवर तपास सुरु केला होता. मंगळवारी तपासात या एजन्सीला कथितरित्या स्विस बँकेशी संबंधित काही दस्तऐवज मिळाले होते.
- एका महिलेच्या नावावर हे खाते आहे. रोहित टंडन आणि चेन्नईतील के. जे. शेखर रेड्डी यांच्या कंपनीतून मोठ्या संख्येने नव्या नोटा सापडल्याच्या प्रकरणात लोढाला अटक करण्यात आली आहे. एजन्सीने असा दावा केला आहे की, जुन्या नोटा बदलून देण्यासाठी लोढा १५ ते २० टक्के कमिशन घेत होता. लोढा याने कबूल केले आहे की, त्यांनी २५ कोटी रुपये जुन्या नोटांच्या बदल्यात बदलून दिले आहेत.