मातृत्व रजा २६ आठवडे
By Admin | Published: August 12, 2016 04:47 AM2016-08-12T04:47:02+5:302016-08-12T04:47:02+5:30
बाळंतपणाची सध्या असलेली तीन महिन्यांची भरपगारी रजा वाढवून साडेसहा महिने (२६ आठवडे) करण्याची तरतूद असलेले विधेयक राज्यसभेने गुरुवारी मंजूर केले.
नवी दिल्ली : बाळंतपणाची सध्या असलेली तीन महिन्यांची भरपगारी रजा वाढवून साडेसहा महिने (२६ आठवडे) करण्याची तरतूद असलेले विधेयक राज्यसभेने गुरुवारी मंजूर केले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी लोकसभेतही हे विधेयक मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर, राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यावर हा बदल लागू होईल व त्याचा लाभ सरकारी कार्यालये, तसेच खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या सुमारे १८ लाख महिलांना होईल.
1961 च्या ‘मॅटर्निटी बेनिफिट््स अॅक्ट’ मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यातील तरतुदी अशा:पहिल्या दोन मुलांपर्यंत
26 आठवडे बाळंतपणाची रजा मिळणार. त्यानंतरच्या मुलांच्या जन्माच्या वेळी 12 आठवड्यांची रजा.
मूल दत्तक घेणाऱ्या मातेला व ‘भाडोत्री मातृत्व’ पद्धतीने मूल जन्माला घालणाऱ्या महिलांनाही १२ आठवडे रजा.
50 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या ठिकाणी पाळणाघराची सोय करणे सक्तीचे. कंपनीत सोय असल्यास या रजेनंतरही घरून काम करण्याची मुभा.