गणिताशी छत्तीसचा आकडा, सायन्सशीही (प्र)योग जुळेना!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 10:28 AM2019-03-24T10:28:25+5:302019-03-24T10:34:02+5:30
भारतीय विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या दोन विषयांची सर्वाधिक भीती वाटत असल्याचे नुकत्याच ब्रेनली या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणावरून समोर आले आहे.
मुंबई - भारतीय विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या दोन विषयांची सर्वाधिक भीती वाटत असल्याचे नुकत्याच ब्रेनली या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणावरून समोर आले आहे. ताण आणि आपल्या अभ्यासातील कामगिरीविषयी भीती वाटणे अशा समस्या परीक्षा काळात विद्यार्थ्यांमध्ये सर्रास आढळून येतात. जवळपास प्रत्येक भारतीयविद्यार्थी परीक्षा काळात अशाच तणावपूर्ण मन:स्थितीतून जात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
ब्रेनली ही जगातील सर्वांत मोठी पिअर-टू-पिअर लर्निंग कम्युनिटी म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांचा परीक्षांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन समजून घेण्यासाठी त्यांनी हे सर्वेक्षण केले होते. मुंबईसह उर्वरित भारतातील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. गणित, विज्ञान विषयाची सर्वाधिक भीती वाटत असल्यानेच ६५% विद्यार्थ्यांनी या दोन विषयांच्या तयारीवर जास्त भर देणार असल्याचे सांगितले; तर आम्ही जी तयारी करतो त्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत ६४% विद्यार्थ्यांनी नोंदविले. गणित, विज्ञानाची भीती दूर करण्यासाठी अभ्यासाची पद्धत बदलायला हवी, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला.
संगीत ऐकण्यास पसंती
परीक्षेदरम्यान केलेला अभ्यास विसरायला होतो, अशी भीतीही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली. आपल्याकडून असलेल्या इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, सुयश मिळविण्यासाठी हे विद्यार्थी सर्वाधिक संघर्ष करत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी संगीत ऐकण्याला सर्वाधिक विद्यार्थ्यांनी पसंती दिली त्याखालोखाल सिनेमा पाहणे, गेम्स खेळणे, झोप घेणे आदी पर्याय निवडले.