Hema Malini : कडक उन्हात हेमा मालिनी पोहोचल्या थेट शेतात, पदर खोचून केलं काम; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 10:59 AM2024-04-12T10:59:00+5:302024-04-12T11:04:58+5:30
Hema Malini And Lok Sabha Elections 2024 : अभिनेत्री हेमा मालिनी सध्या निवडणूक प्रचारात खूप व्यस्त आहेत. गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान हेमा मालिनी थेट शेतात पोहोचल्या
मथुरेच्या लोकसभा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी सध्या निवडणूक प्रचारात खूप व्यस्त आहेत. गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान हेमा मालिनी थेट शेतात पोहोचल्या आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कडक उन्हात त्या हातात विळा घेऊन शेतात पिकांची कापणी करताना दिसल्या.
हेमा मालिनी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेतात पिकांची कापणी करत असल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्या कांजीवरम साडी नेसून, पदर खोचून भर उन्हात दुपारच्या वेळी शेतकऱ्यांसोबत दिसतात. अचानक हेमा मालिनी यांना पाहून शेतकरी महिला देखील आश्चर्यचकित झाल्या. त्यांना सुखद धक्का मिळाला.
सोशल मीडियावर शेतातील हे फोटो शेअर करताना हेमा मालिनी यांनी "आज मी शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, ज्यांना मी गेल्या दहा वर्षांपासून नियमित भेटत आहे. मला त्यांच्यासोबत खूप छान वाटलं. मी त्यांच्यासोबत पोज द्यावी असा आग्रह त्यांनी धरला, त्यानंतर मी देखील ते केलं" असं म्हटलं आहे.
Today I went into the farms to interact with the farmers who I have been meeting regularly these 10 years. They loved having me in their midst and insisted I pose with them which I did❤️ pic.twitter.com/iRD4y9DH4k
— Hema Malini (@dreamgirlhema) April 11, 2024
हेमा मालिनी यांनी शेतात उपस्थित शेतकऱ्यांशी, महिलांशी संवाद साधला आणि फोटोही काढले. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. लोकांना हे फोटो खूप आवडत आहेत. याआधीही हेमा मालिनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशाच पद्धतीने शेतकऱ्यांसोबत दिसल्या होत्या. मात्र, त्यानंतर विरोधी पक्षांनीही त्यांच्यावर टीका केली होती आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्या काहीही करत असल्याचं म्हटलं होतं.
हेमा मालिनी या मतदारसंघातून सलग दोन वेळा खासदार आहेत. यावेळीही भाजपाने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिलं आहे. दुसरीकडे सपा-काँग्रेस आघाडीत ही जागा काँग्रेसच्या खात्यात आली आहे. काँग्रेसने येथून मुकेश धनगर यांना तिकीट दिलं आहे, तर बसपाकडून सुरेश सिंह रिंगणात आहेत.