ती बाब सुशील कुमार मोदींना पडली भारी, उपमुख्यमंत्रिपदावर सोडावे लागले पाणी
By बाळकृष्ण परब | Published: November 15, 2020 08:21 PM2020-11-15T20:21:55+5:302020-11-15T20:26:19+5:30
Sushil Kumar Modi News : गेली अनेक वर्षे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुशील कुमार मोदी यांच्या नावावर पक्ष नेतृत्वाने काट मारली आहे.
पाटणा - बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकीकडे बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी नितीश कुमार नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपदासाठी बिहार भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यात गेली अनेक वर्षे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुशील कुमार मोदी यांच्या नावावर पक्ष नेतृत्वाने काट मारली असून, आता उपमुख्यमंत्रिपदासाठी अन्य नेत्यांची नावे समोर येत आहेत. दरम्यान, सुशील कुमार मोदी यांचे उपमुख्यमंत्रिपद जाण्यामागचे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील असे भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्याचवेळी राज्यातील उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेल्या सुशील कुमार मोदी यांची उचलबांगडी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. स्वत: सुशील कुमार मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म समोरून उपमुख्यमंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे. आता नितीश कुमार यांच्यासोबत असलेली मैत्रीच सुशील कुमार मोदी यांना भारी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुशील कुमार मोदी यांनी बिहारमध्ये भाजपाला नितीश कुमार यांची मांडलिक बनवल्याचा अनेक विश्लेषकांचे म्हणणे होते.
नितीश कुमार आणि सुशील कुमार मोदी यांची जोडी जगजाहीर होती. जेडीयूच्या नेत्यांपेक्षा सुशील कुमार मोदी हेच नितीश कुमार यांचा अधिक बचाव करत असत. त्यामुळेच १५ वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात नितीश कुमार आणि सुशील कुमार मोदी यांना सरकार चालवताना कधीच कुठली अडचण आली नव्हती. मात्र २०१२ मध्ये सुशील कुमार मोदी यांनी केलेल्या एका विधानामुळे ही जोडी खटकली होती. त्यावेळी सुशील कुमार मोदी यांनी नितीश कुमार यांचा उल्लेख पीएम मटेरियल असा केला होता. मात्र त्याच वेळी बिहार भाजपामधील अन्य नेते हे नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा देत होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामधून नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी होत होती. गुजरात दंगलीच्या मुद्द्यावरून नितीश कुमार यांचा प्रश्न सातत्याने नरेंद्र मोदींचा विरोध करत होता. तर भाजपाचे गिरिराज सिंह यांच्यासारखे नेते मोदींना पाठिंबा देत होते. अश्विनी चौबेसुद्धा मोदींचे नाव पुढे रेटत होते. मात्र त्याचवेळी २०१२ मधील एका मुलाखतीत नीतीश कुमार पीएम मटेरियल असल्याचे म्हटले होते.
मात्र सुशील कुमार मोदी यांचे हे विधान भाजपा्च्या पक्ष नेतृत्वाला आवडली नव्हती. अशा परिस्थितीत तेव्हा केलेल्या चुकीचा फटका सुशील कुमार मोदी यांना आता बसला आहे का, अशी चर्चा आता बिहारच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, सुशील कुमार मोदी यांच्याबाबत केंद्रात मंत्रिमंडळामध्ये असलेले नेतेही नाराज होते. कारण सुशील कुमार मोदी हे नितीश कुमार यांच्या बचावासाठी सातत्याने पुढे येत असत. गेल्या १५ वर्षांपासून भाजपा बिहारमध्ये सत्तेत असला तरी भाजपा नितीश कुमार यांच्या छत्रछायेतून बाहेर पडत नव्हता. मा्त्र यावेळी भाजपा बिहारमध्ये मोठा पक्ष ठरला आहे, अशा परिस्थितीत भाजपाकडे सरकारमध्ये वरचष्मा राखण्याची संधी आहे.