PFI विरोधात बोलणं बंद करा नाहीतर संपवून टाकू; मौलाना रिझवी यांना मिळाली धमकी, चौकशीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 06:33 PM2022-09-30T18:33:50+5:302022-09-30T18:35:02+5:30
देशात पीएफआयवर बंदी घातल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे.
नवी दिल्ली-
देशात पीएफआयवर बंदी घातल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. त्याचबरोबर पीएफआयला विरोध करणाऱ्यांनाही सतत धमक्या मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांना पीएफआयचा निषेध केल्यामुळे फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. फोन करणाऱ्यानं आपलं नाव अब्दुल समद असल्याचं सांगितलं असून तो शाहीन बाग येथील रहिवासी असल्याचा दावा त्यानं केला आहे. फोन करणाऱ्यानं पीएफआयच्या विरोधात बोलणं बंद करा अन्यथा तुम्हाला संपवून टाकू अशी धमकी दिली आहे.
मौलाना शहाबुद्दीन रिझवी हे ऑल इंडिया मुस्लिम जमात दर्गाह आला हजरत बरेली शरीफचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शहाबुद्दीन रिझवी यांनी केंद्र सरकारकडे पीएफआयवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. गुरुवारी मौलानाला धमकी देणाऱ्या व्यक्तीने फोन करून पीएफआयच्या विरोधात बोलणे बंद करा अन्यथा तुम्हाला संपवून टाकू, अशी धमकी दिली आहे.
मौलानानं फोन आणि व्हॉट्सअॅपवर बरेलीचे डीएम, एसएसपी यांना याची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी मौलाना यांनी एसएसपींची भेट घेऊन याबाबत तक्रार केली. शहाबुद्दीन रिझवी यांनी आपल्याला फोनवरुन जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची माहिती डीएम आणि एसएसपी यांना दिली. धमकी देणाऱ्यानं आपण दिल्लीतील शाहीन बाग येथील रहिवासी असल्याचं सांगितलं आहे. तो त्यांना सतत धमक्या देत आहे.
मौलाना रिझवी यांनी केली सुरक्षेची मागणी
"मी सातत्याने पीएफआयला विरोध करत आहे, त्यामुळे पीएफआय कट्टरतावादी संघटनेकडून या धमक्या येत आहेत. पीएफआय देशाची एकता आणि अखंडतेला धोका आहे. इस्लामची बदनामी करत आहे आणि मुस्लिमांचं नाव खराब करण्याचं काम करत आहे. आज पीएफआयमुळे संपूर्ण देशात कट्टरतावादी विचारसरणीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे मी पीएफआयला सतत विरोध करत आहे. यामुळेच मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत", असं मौलाना शहाबुद्दीन रिझवी म्हणाले.
मी धमक्यांना घाबरणारा नाही
"मी पीएफआयच्या कोणत्याही धमकीच्या कॉलला घाबरत नाही. देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी, इस्लामला बदनाम होण्यापासून वाचवण्यासाठी मला जे काही बलिदान द्यावे लागेल ते देईन. पीएफआयविरोधात माझे जनआंदोलन सुरूच राहणार आहे. मी घाबरणार नाही आणि माझे सहकारी देखील घाबरणार नाहीत. प्रचार करून मी कट्टरतावाद्यांच्या विरोधात त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात प्रचार करत राहीन", असं रिझवी म्हणाले.