“पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र, देशभर आंदोलन करणार”; मौलाना तौकीर रझा यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 10:58 PM2022-04-21T22:58:23+5:302022-04-21T22:59:52+5:30
देश पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने जात आहे, या रझा यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बरेली: राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी देशभरात झालेल्या हिंसक घटनांनतर आता पुन्हा एकदा जातीय हिंसाचाराबद्दल केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांबाबत पंतप्रधान मोदी गप्प का, अशी विचारणा विरोधी पक्षांनी केली आहे. यातच आता मौलाना तौकीर रझा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र असल्याची टीका केली आहे.
उत्तर प्रदेशमधील बरेली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मौलाना तौकीर रझा यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बुलडोझर कारवाई आणि लाऊडस्पीकर वादावर बोलताना, ज्या दिवशी देशातील मुस्लिम रस्त्यावर येतील, तेव्हा त्यांना सांभाळणे फार कठीण होईल, अशा इशारा रझा यांनी यावेळी बोलताना दिला. दुसरीकडे, जे मर्यादा पुरुषोत्तम राम मानतात, रामचरित मानस वाचतात, हनुमान मानतात, हनुमान चालीसा पाठ करतात, त्यांना कोणाला रोखण्याचा अधिकार नाही. पण इतरांना त्रास देण्याचे काम कले जात असेल तर ते योग्य नाही, असे रझा म्हणाले.
भारतात महाभारत घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही
दिल्लीतील हिंसाचारानंतर तेथे करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईबाबत केलेल्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देशात जी परिस्थिती आहे, ती चांगली नाही. आमच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे. मुस्लिम रस्त्यावर येतील, तेव्हा परिस्थिती कठीण होऊ शकेल. भारतात महाभारत घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे रझा यांनी म्हटले आहे. तसेच देश पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने जात असल्याचे वक्तव्यही रझा यांनी केले आहे. याशिवाय देशातील वातावरण विचित्र बनले आहे. यंदाच्या वर्षी ईद आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आहे. ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी फुटीरतावादावर विश्वास ठेवणाऱ्यांना आपल्या देशातील वातावरण बिघडवण्याची संधी मिळेल. एकता आणि बंधुतेचा संदेश आम्ही नेहमीच देतो. द्वेष पसरवल्यामुळे लोक संतप्त झाले आहेत, त्यामुळे अशा घटना घडत आहेत, असे रझा म्हणाले.
दरम्यान, दिल्लीतून जेल भरो आंदोलन सुरू होणार आहे. १० दिवसांनी बैठक होणार असून, त्यानंतर जेल भरो आंदोलनाची तारीख ठरवली जाणार आहे. ज्यामध्ये देशभरातून करोडो लोक पोहोचतील. तौकीर रझा म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या आमदारांनी पक्षाचा राजीनामा द्यावा, कारण ते केवळ मुस्लिमांच्या मतांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे.