AIMPLB मधून हकालपट्टी करण्यात आलेले मौलवी म्हणाले, दंगली घडवण्यास इच्छुक असणाऱ्यांची साथ देणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 09:24 PM2018-02-11T21:24:48+5:302018-02-11T21:26:31+5:30
अयोध्येतील राम जन्मभूमी विवाद सोडवण्यासाठी तोडगा सुचवणारे मौलाना सय्यद सलमान हुसेनी नदवी यांची ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, आपणच AIMPLB मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा केला आहे.
नवी दिल्ली - अयोध्येतील राम जन्मभूमी विवाद सोडवण्यासाठी तोडगा सुचवणारे मौलाना सय्यद सलमान हुसेनी नदवी यांची ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांच्याशी झालेल्या बैठकीवेळी नदवी यांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील वाद सोडवण्यासाठी मौलवी नदवी यांनी तोडगा सुचवला होता. दरम्यान, आपणच AIMPLB मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा केला आहे.
AIMPLB च्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नदवी म्हणाले मुस्लिम पर्सनल लॉ बौर्डाच्या पहिल्या बैठकीनंतर मी स्वत:ला या सगळ्या पासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जे लढाई आणि दंगली घ़डवून आणण्यास इच्छुक आहेत, अशा लोकांची साथ द्यायची नाही, उलट जे शांती आणि बंधुभाव प्रस्थापित करण्यास इच्छुक आहेत, अशा व्यक्तींची साथ द्यायची, असे मी ठरवले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा निवाडा चर्चेतून व्हावा अशी माझी इच्छा आहे. आता आमची पुढील बैठक अयोध्येत होईल तेथे सर्व साधू-संतांसह या प्रस्तावावर पुढील विचार केला जाईल.
दरम्यान, अयोध्येतील बाबरी मशीद - रामजन्मभूमीच्या २.७७ एकर जमिनीच्या मालकीसंबंधीच्या अपिलांवर सुनावणी करताना धार्मिक श्रद्धा किंवा न्यायालयाबाहेर सुरू असलेला वाद या गोष्टींना थारा देणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने काल स्पष्ट केलं आहे. जमिनीच्या मालकीसंबंधीच्या नेहमीच्या दाव्यांप्रमाणेच ही सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर, 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी शुक्रवारी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि सुन्नी वक्फ बोर्डाच्या सदस्यांची भेट घेतली. याआधी, अयोध्या प्रश्नी न्यायालयाबाहेरच तोडगा काढण्याची सूचना गेल्या वर्षी तत्कालीन सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी केली होती. तेव्हाही, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला होता.
वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी सोडावी आणि मशीद बाहेर अन्य जागी उभारावी, असा प्रस्ताव रविशंकर यांनी मुस्लिम संघटनांच्या नेत्यांना दिला. तो त्यांनी मान्य केल्याचे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या वतीने सांगण्यात आलं होते. परंतु, बाबरी मशीद कृती समितीचे संयोजक जफरयाब गिलानी यांनी श्री श्रींचा फॉर्म्युला अमान्य असल्याचे सांगितले.