देवा, माझ्या वडिलांना बरे कर!; शर्मिष्ठा मुखर्जींची ईश्वराकडे प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:46 AM2020-08-13T03:46:12+5:302020-08-13T03:46:28+5:30
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर; प्रकृती चिंताजनकच
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग झालेले तसेच मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक च आहे. आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून तेथील डॉक्टरांनी बुधवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. प्रणव मुखर्जी यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे.
प्रणव मुखर्जी यांची मुलगी व काँग्रेसच्या नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, गेल्या वर्षी आठ आॅगस्टला प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात आले होते. माझ्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांपैकी तो एक क्षण आहे. त्यानंतर एक वर्षाने परिस्थिती बदलली आहे. माझे वडील खूप आजारी आहेत. त्यांना बरे कर. सर्व सुखदु:ख सहन करण्याची त्यांना शक्ती दे अशी प्रार्थना शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ईश्वराकडे केली आहे. तसे त्यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.
आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्वत: प्रणव मुखर्जी यांनी टिष्ट्वट करून जाहीर केले होते. मेंदूत गाठ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना कोरोनाही झाल्याचे तिथे केलेल्या चाचण्यांतून सिद्ध झाले. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहनही मुखर्जी यांनी केले होते.
मेंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. ते प्रसाधनगृहात घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूतील रक्त गोठल्याचेही सूत्रांनी सांगितले.