'लक्ष्मी' गरिबांना आशीर्वाद देईल; अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींना आशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 06:24 IST2025-02-01T06:23:54+5:302025-02-01T06:24:22+5:30
महिलांच्या समान हक्कांसाठी पावले उचलणार असल्याचे दिले आश्वासन.

'लक्ष्मी' गरिबांना आशीर्वाद देईल; अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींना आशा
नवी दिल्ली : धनदेवता लक्ष्मी गरीब व मध्यमवर्गीयांना आशीर्वाद देईल, अशी मला आशा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात गरीब, मध्यमवर्गीयांचे हित जपणाऱ्या अनेक तरतुदी असतील. महिलांना समान हक्क मिळण्यासंदर्भातही पावले उचलत आहोत, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सांगितले की, पंथ, धर्म यापलीकडे जाऊन महिलांना समान हक्क मिळण्याच्या दृष्टीने या अधिवेशनात निर्णय घेतले जातील. त्यामुळे अर्थसंकल्पात महिलांबाबतही काही विशेष तरतुदी असतील अशी चर्चा मोदी यांच्या वक्तव्यानंतर रंगली. अधिवेशनात ऐतिहासिक विधेयकांवर संसदेत चर्चा होऊन त्यांचे कायद्यात रुपांतर होईल.
संसदीय अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी विदेशातून भारतात दुही माजविण्याचा प्रयत्न झाला नाही, अशी २०१४पासूनची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. अधिवेशनाच्या प्रारंभी विदेशातील काही लोक अडचणी निर्माण करण्यासाठी सज्ज असायचे तसेच त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणारे काही लोक भारतातही आहेत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान