संभाव्य निकालांबाबत मायावती-अखिलेश यांच्यात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 05:15 AM2019-05-21T05:15:45+5:302019-05-21T05:16:01+5:30
एक्झिट पोलचा धसका : उत्तर प्रदेशावर साऱ्या देशाचे लक्ष; महागठबंधनला मिळणाºया जागांबाबत उत्सुकता
लखनऊ : राष्ट्रीय राजकारणात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सप-बसप आघाडी भाजपपेक्षा लोकसभेच्या जास्त जागा जिंकेल, असा निष्कर्ष एक्झिट पोलमधून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बसपच्या प्रमुख मायावती व समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी चर्चा केली.
मायावती यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी अखिलेश यादव यांनी सुमारे तासभर चर्चा केली. त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा तपशील कळू शकलेला नाही. तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी या दोन नेत्यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकांत कोणालाच बहुमत न मिळाल्यास केंद्रात सरकार स्थापनेसाठी काय रणनीती आखायची, याबाबत त्यांच्याशी नायडू यांनी चर्चा केली होती.
भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसला दूर ठेवून सप व बसपने लोकसभा निवडणुकांत आघाडी केली होती. उत्तर प्रदेशमध्ये ८० लोकसभेच्या जागा आहेत. जागावाटपानुसार बसपला ३८ व सपला ३७ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रीय लोक दलाला २ जागा देण्यात आल्या होत्या, तसेच रायबरेली, अमेठी येथे अनुक्रमे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात आपला उमेदवार उभे न करण्याचे बसप, सपने ठरविले होते. (वृत्तसंस्था)
भाजपवर मात करणार?
उत्तर प्रदेशमध्ये सप-बसप आघाडी भाजपकडूनही काही जागा खेचून घेईल, असेही म्हटले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये ७१ जागा जिंकल्या होत्या. सी व्होटर-रिपब्लिकच्या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे की, सप-बसप आघाडीला ४० व भाजपला ३८ जागा मिळतील. जन की बात पोलच्या निष्कर्षानुसार भाजपला ४६ ते ५७ जागा, तर सप-बसपला १५ ते २९ जागा मिळतील. एबीपी न्यूजच्या एक्झिट पोलने उत्तर प्रदेशात भाजपला २२ जागा मिळतील, असे म्हटले आहे.