मायावती व स्मृती इराणींची खडाजंगी

By admin | Published: February 25, 2016 03:27 AM2016-02-25T03:27:02+5:302016-02-25T03:27:02+5:30

देशभर दलित विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप करीत, रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणी बसपच्या प्रमुख मायावतींनी राज्यसभेत बुधवारी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी

Mayawati and Smriti Irani are in the fray | मायावती व स्मृती इराणींची खडाजंगी

मायावती व स्मृती इराणींची खडाजंगी

Next

नवी दिल्ली : देशभर दलित विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप करीत, रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणी बसपच्या प्रमुख मायावतींनी राज्यसभेत बुधवारी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांचा राजीनामा मागितला. प्रत्युत्तरादाखल स्मृती इराणी म्हणाल्या की, ‘मायावतींच्या तमाम आक्षेपांचे उत्तर देण्यास मी तयार आहे. मात्र, आरोप- प्रत्यारोपांच्या रणनीतीसाठी एका मृत विद्यार्थ्याचा जर कोणी शस्त्रासारखा वापर करणार असेल, तर तो आम्हाला कदापि मान्य नाही.
मायावतींनी शून्यप्रहरात रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा विषय उपस्थित केला. आत्महत्येसाठी रोहितला मजबूर करण्यात आले. सबब आत्महत्येच्या चौकशी पथकात किमान एका दलिताचा समावेश असायलाच हवा, ही मायावतींची प्रमुख मागणी होती. सरकार जोपर्यंत ही मागणी मान्य करीत नाही, सभागृहाचे कामकाज चालू दिले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. त्यावेळी बसप सदस्यांनी सरकारविरोधी घोषणा सुरू केल्या. त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली मायावतींना म्हणाले की, तुम्ही आरोप केला आहे, तर सरकारचे उत्तरही तुम्हाला ऐकावेच लागेल. मात्र, स्मृती इराणी सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप बसपचे सतीशचंद्र मिश्रा यांनी करताच, त्या उसळून उत्तर द्यायला उठल्या; पण इराणींना थांबवत माकपचे सीताराम येचुरी म्हणाले की, आपण मंत्री आहात, सभागृहात तुमचे वर्तन मंत्र्यासारखेच असले पाहिजे.
मायावतींच्या अगोदर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी जेएनयू विद्यार्थ्यांवरील देशद्रोहाच्या खटल्याचे प्रकरण उपस्थित केले होते. चर्चेत सहभागी होताना, सीताराम येचुरी म्हणाले की, सरकार देशद्रोहाच्या कायद्याचा राजरोस दुरुपयोग करीत असल्याने सभागृहात चर्चा नेमकी कशावर, असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर जेएनयू आणि रोहित वेमुलाची आत्महत्या ही दोन वेगळी प्रकरणे असल्याने दोन्ही विषयांवर स्वतंत्र चर्चा हवी, अशी मागणी मायावती यांनी केली. कामकाज सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक संघर्षामुळे पहिल्याच तासात ३वेळा व दिवसभरात ७ वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Mayawati and Smriti Irani are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.