मायावती ट्विटरवर झाल्या सक्रिय, आता विरोधकांवर साधणार निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 12:47 PM2019-02-06T12:47:52+5:302019-02-06T12:48:08+5:30
गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियापासून दूर असलेल्या मायावती पुन्हा एकदा ट्विटरवर सक्रिय झाल्या आहेत.
लखनऊ: गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियापासून दूर असलेल्या मायावती पुन्हा एकदा ट्विटरवर सक्रिय झाल्या आहेत. तर दुसरीकडे बहुजन समाज पक्षाच्या काही नेत्यांनी सोशल मीडियापासून दूर राहणंच पसंत केलं आहे. मायावतीनंट्विटरवर स्वतःचं अधिकृत अकाऊंट उघडलं असून, आता त्या सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत. मायावतींनी ऑक्टोबर 2018मध्ये हे खातं तयार केलं होतं. परंतु जानेवारी2019पर्यंत यावर त्यांनी कोणतंही ट्विट केलं नव्हतं.
22 जानेवारीला त्यांनी पहिलं ट्विट केलं होतं. मायावतींनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, नमस्कार बंधू-भगिनींनो, पूर्ण सन्मानानं मी ट्विटवर पाऊल ठेवत आहे. हे माझं पहिलं ट्विट आहे. @sushrimayawati हे माझं अधिकृत अकाऊंट असून, मी भविष्यातही या अकाऊंटवरून सक्रिय असेन. मायावती आणि त्यांच्या पक्षाचे मोठे नेते सोशल मीडियासारख्या माध्यमावर नसणं ही आश्चर्यचकित करणारी घटना आहे. अनेकदा बीएसपीच्या नावानं बनावट अकाऊंट उघडली जात होती. पक्षानं नेहमीच अशा वृत्ताचं खंडन केलं होतं.
Hello brothers and sisters. With due respect let me introduce myself to the Twitter family. This is my opening and inauguration. @sushrimayawati is my official Twitter handle for all my future interactions, comments and updates. With warm regards. Thank you.
— Mayawati (@SushriMayawati) January 22, 2019
बुधवारी मायावतींचं ट्विटर अकाऊंटची खातरजमाही झाली आहे. त्या अकाऊंटवर ब्लू टिक आहे. बीएसपीच्या एका नेत्यानं प्रसिद्धिपत्रकाद्वारे मायावतींच्या ट्विटर अकाऊंटसंदर्भात माहिती दिली आहे. अकाऊंटची खातरजमा झाल्यानंतर मायावतींचे फॉलोअर्स वाढतच चालले आहेत. आतापर्यंत मायावतींनी 12 ट्विट केले असून, मायावती एकाच व्यक्तीला फॉलो करतात, तर मायावतींचे फॉलोअर्स 16 हजारांच्या घरात आहेत.