Mayawati : "यूपीची मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकते पण राष्ट्रपती नाही"; मायावतींनी सांगितली 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:41 PM2022-06-29T15:41:03+5:302022-06-29T15:51:53+5:30
Mayawati News : बसपाच्या मायावती यांनी पत्रकार परिषद घेतली आणि समाजवादी पक्षावर (सपा) अनेक गंभीर आरोप केले.
नवी दिल्ली - बसपाचे सरचिटणीस सतीश मिश्रा आणि बसपाचे एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांची भेट घेतली. या बैठकीनंतर बसपाच्या मायावती (Mayawati) यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी समाजवादी पक्षावर (सपा) अनेक गंभीर आरोप केले. 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत मायावती म्हणाल्या की, यूपी निवडणुकीला हिंदू-मुस्लिम रंग देण्यासाठी भाजपा-सपा यांची एकत्र आले. भाजपाने सत्तेत पुनरागमन करण्याची जबाबदारी समाजवादी पक्ष आणि त्यांच्या प्रमुखांवर आहे.
पत्रकार परिषदेत मायावती य़ांनी "सपा लोकांची दिशाभूल करत आहे की मी राष्ट्रपती होणार आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की, मी यूपीची मुख्यमंत्री आणि देशाची पंतप्रधान होऊनच देशाची सेवा करू शकते. पण राष्ट्रपती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुस्लिमांनी बसपाला मतदान केले तर मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकते" असं म्हटलं आहे.
"बसपा सरकारमध्ये जी स्मारके बांधली गेली, त्यांची देखभाल सपा सरकार आणि भाजपा सरकार करत नाही. बसपाचे शिष्टमंडळ सतीश मिश्रा आणि उमाशंकर सिंह यांनी यासंदर्भात माझे पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. एसपीकडून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा हेतू केवळ स्मारकांबाबत होता" असं देखील म्हटलं आहे.
मायावती म्हणाल्या की, रमजानच्या महिन्यात वीज तोडणे योग्य नाही आणि सरकारने याबाबत काहीतरी केले पाहिजे. मुस्लिम आणि इतरांवरील सर्व अत्याचारांना सपा पक्ष जबाबदार आहे. मायावतींच्या म्हणण्यानुसार, सत्ता गेल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या उद्यानांची आणि स्मारकांची काळजी घेतली जात नाही. अशा स्थितीत राज्याच्या सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी त्यांची इच्छा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.