मायावतींनी भाच्यावर मोठी जबाबदारी सोपविली; चार राज्यांच्या विधानसभा लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 08:25 AM2023-06-14T08:25:56+5:302023-06-14T08:29:48+5:30
राजकीयदृष्ट्या मायावतींचा बसपा पक्ष ना राज्यात ना देशात निर्णायक स्थितीत दिसत आहे.
बिहारचा पूल जेव्हा कोसळला तेव्हा मायवतींच्या हत्तींची सर्वांना आठवण झाली होती. तसे पहायचे झाल्यास राजकीयदृष्ट्या मायावतींचा बसपा पक्ष ना राज्यात ना देशात निर्णायक स्थितीत दिसत आहे. लोकसभा निवडणूक पाहून मायावतींनी गेल्या काही काळापासून पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाचा आकाश आनंद यांच्यावर चार राज्यांची जबाबदारी सोपविली आहे.
मायावती यांनी आकाशना राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगाना आणि मध्य प्रदेशच्या येत्या निवडणुकांची जबाबदारी दिली आहे. यानंतर आकाश यांनी मायावती यांचे आभार मानले आहेत. दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीयांचे सर्व स्तरांवर होणारे शोषण, गरिबी, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवर आपण या राज्यांतील विधानसभा निवडणुका लढवू असे मायावतींनी आपल्याला सांगितल्याचे आनंद म्हणाले.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये मोठा हिंदुत्ववादी कोण हे सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू असल्याचे, मायावती म्हणाल्या. व्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराच्या नावाखाली देशात धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे.
मायावतींनी सांगितले की त्यांचा पक्ष या चार राज्यांत पूर्ण तयारीने लढणार आहे. हिंदुत्ववादी आणि हिंदू भक्त कोण आहे हे दाखविण्याचा स्पर्धेत अन्य समाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे. दोन्ही पक्षांनी हिंदूंसोबत अन्य समाजांवर लक्ष द्यायला हवे, असे त्या म्हणाल्या.
बसपा प्रमुख मायावती यांचा भाचा आकाश आनंदचा या वर्षी मार्चमध्ये विवाह झाला होता. त्यांचा विवाह डॉ. प्रज्ञा सिद्धार्थ यांच्याशी झाला आहे. आकाश यांनी लंडनमधून एमबीएची पदवी घेतली आहे. अशोक सिद्धार्थ यांची मुलगी प्रज्ञा सिद्धार्थ हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी नोकरी सोडून २००८ साली मायावतींसोबत राजकारणात प्रवेश केला. अशोक सिद्धार्थ 2009 मध्ये एमएलसी होते आणि त्यानंतर 2016 ते 2022 पर्यंत राज्यसभा सदस्य होते.