अखिलेशना आणण्यासाठी गेली मायावतींची मर्सिडीज, लोकसभेसाठी एकत्र येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:48 AM2018-03-16T01:48:09+5:302018-03-16T01:48:09+5:30
उत्तर प्रदेशातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी भाजपाला पराभूत केले आणि त्याबद्दल अखिलेश यादव यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांचे आभार मानले.
लखनऊ : उत्तर प्रदेशातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनी भाजपाला पराभूत केले आणि त्याबद्दल अखिलेश यादव यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांचे आभार मानले. पण तेवढ्याने दोन्ही पक्षांतील आनंद थांबला नाही. मायावती यांनी आपली काळ्या रंगाची मर्सिडीज अखिलेश यांच्याकडे पाठवली. त्यात बसून अखिलेशही लगेच मायावती यांना भेटायला आले.
अखिलेश व मायावती यांची तासभर चर्चा झाली. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांसाठी आघाडी करण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जाते. मात्र बैठकीनंतर अखिलेश यांनी काही बोलण्यास नकार दिला. पत्रकारांच्या दिशेने हात उंचावून ते निघून निघून गेले. नेहमीप्रमाणे त्यांच्या डोक्यावर लाल टोपी होती.
राज्यात सपा व बसपा एवढीच आघाडी न करता, त्यात काँग्रेसलाही सहभागी करावे, असे यादव यांचे मत आहे. पोटनिवडणुकांत काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असली तरी आघाडीत तो पक्ष असावा, असे त्यांना वाटत असल्याचे सपाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मुलायमसिंग यादव पक्षप्रमुख असेपर्यंत मायावती यांनी सपाशी आघाडी करण्याचे टाळले होते. आता त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसते. मात्र काँग्रेसविषयी त्यांचे आक्षेप कायम आहेत.
>मतपत्रिकाच उत्तम
ईव्हीएममध्ये समस्या नसत्या तर आमचे उमेदवार याहून अधिक मतांनी विजयी झाले असते, असा दावाही अखिलेश यांनी केला. अनेक ठिकाणी ईव्हीएम नीट चालत होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेत वेळ गेला. अनेकांना मतदान करणे शक्य झाले नाही. मतपत्रिका हाच उत्तम मार्ग असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.