मायावती करणार मुलायम सिंहांचा प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 05:27 AM2019-03-17T05:27:20+5:302019-03-17T11:39:13+5:30
उत्तर प्रदेशातील सपा-बसपा आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांचा जाहीर प्रचार करणार असले तरी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती या सपाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांच्या मैनपुरी मतदारसंघात प्रचारासाठी जाणार असल्याचे कळल्याने दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते अचंबित झाले आहेत.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील सपा-बसपा आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांचा जाहीर प्रचार करणार असले तरी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती या सपाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांच्या मैनपुरी मतदारसंघात प्रचारासाठी जाणार असल्याचे कळल्याने दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते अचंबित झाले आहेत.
मुलायम सिंह यादव व मायावती यांचे तब्बल २४ वर्षांपासूनचे वैर असून, ते एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत. मात्र आता सपाची सारी सूत्रे अखिलेश यादव याच्या हाती असून, त्यांनी जुने भांडण विसरून भाजपाच्या पराभवसासाठी एकत्र येण्याचे आवाहन मायावती यांना केले आहे. पक्ष काही पोटनिवडणुकींबरोबरच आता लोकसभेसाठीही एकत्र आले आहेत. मायावती यांनी जुने वैर बाजूला ठेवून मुलायम सिंह यादव यांचा प्रचार करण्याचे ठरविले आहे. त्या १९ एप्रिलमध्ये मैनपुरीमध्ये प्रचारासाठी जातील. यावेळी अजित सिंह व अखिलेश हेही हजर असतील.
मायावती या २ जून १९९५ रोजी लखनौमधील विश्रामधामात उतरल्या होत्या. त्यावेळी सपा कार्यकर्त्यांनी त्यात घुसून मायावती यांना एका खोलीत कोंडले होते. मुलायम सिंहांच्या सांगण्यावरूनच हा प्रकार झाल्याचा चा आरोप मायावती तेव्हापासून करीत आल्या. तेव्हापासून दोन पक्षांत व नेत्यांत पार बिनसले.
त्याआधी १९९३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांआधी सपा व बसपा यांची आघाडी झाली होती. सपाने २५६ पैकी १0९ तर बसपाने १६४ पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. तरीही त्यांचे बहुमत नव्हते. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार बनवले. मुलायम सिंह मुख्यमंत्री झाले. पण दोन वर्षांत बसपाने ााठिंबा काढून घेतला. त्यामुळे संतापलेल्या सपा कार्यकर्त्यांनी मायावती यांना कोंडले होते. मात्र आता अखिलेश यादव यांनी दोन्ही पक्षांतील मतभेद व वैर संपवले आहे. होळी संपताच नेते एकत्रित प्रचाराला सुरुवात करतील.
सरकारचे ३0४४ कोटी भाजपाच्या प्रचारासाठी?
भाजपाच्या विरोधासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्रच राहू, असे मायावती यांनी सांगितले. मोदी यांनी गेल्या १५/२0 दिवसांत सरकारी खर्चाने भाजपाचा प्रचार केला आणि त्याच्या जाहिरातींवर तब्बल ३0४४ कोटी रुपये खर्च केले, असा आरोपही त्यांनी केला.