राहुल गांधींना 'विदेशी' म्हणणे भोवले; बसपा नेत्याची मायावतींनी केली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 01:28 PM2018-07-17T13:28:04+5:302018-07-17T13:28:14+5:30
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याचे प्रकरण बहुजन समाज पार्टीचे(बसपा) नेते जय प्रकाश सिंह यांना चांगलेच भोवले आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याचे प्रकरण बहुजन समाज पार्टीचे(बसपा) नेते जय प्रकाश सिंह यांना चांगलेच भोवले आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी जय प्रकाश सिंह यांची पार्टीच्या सर्व पदांवरुन हकालपट्टी केली आहे. बसपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय समन्वयक पद त्यांच्याकडे होते.
जय प्रकाश सिंह यांच्यावर कारवाई करताना मायावती म्हणाल्या की, बसपाचे राष्ट्रीय समन्वयक जय प्रकाश सिंह यांनी केलेले भाषण मला समजले. त्यामध्ये त्यांनी बसपाच्या विचारसरणीविरोधात बोलले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी दुस-या पार्टीच्या नेतृत्वाविरोधात व्यक्तीगत आरोप केला आहे. हा आरोप त्यांचा व्यक्तीगत असून त्याचा बसपा पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ पार्टीच्या सर्व पदांवरुन हटविण्यात येत आहे.
I came to know about BSP national coordinator Jai Prakash Singh's speech in which he spoke against ideology of BSP & also made personal remarks against leadership of rival parties. It's his personal opinion. So,he has been removed from his post with immediate effect: Mayawati pic.twitter.com/oZXIkdQvJT
— ANI UP (@ANINewsUP) July 17, 2018
गेल्या सोमवारी लखनऊमध्ये बसपा समन्वयकांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी जय प्रकाश सिंह यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात वक्तव्य केले. राहुल गांधी त्यांच्या वडिलांवर गेले असते, तर काहीतरी आशा होत्या. मात्र, त्यांची आई सोनिया गांधी विदेशी आहे. त्यामुळे त्यांच्यात विदेशी खून आहे, असे जय प्रकाश सिंह म्हणाले. याचबरोबर, त्यांनी असा दावा केला की, राहुल गांधी हे भारतीय राजकारणात कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत.