एक्झिट पोलनंतर मायावतींची कारवाई, जवळच्या नेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 11:56 AM2019-05-21T11:56:15+5:302019-05-21T12:09:29+5:30
पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली रामवीर उपाध्याय यांची पार्टीच्या संपर्क प्रमुख पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
लखनऊ : एक्झिट पोलनंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावाती यांनी एक मोठी कारवाई केली आहे. पक्षाचे नेते रामवीर उपाध्याय यांना मायावतींनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली रामवीर उपाध्याय यांची पार्टीच्या संपर्क प्रमुख पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
रामवीर उपाध्याय यांचा लोकसभा निवडणुकी दरम्यान पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग होता. यासंदर्भात त्यांना सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. तरिही रामवीर उपाध्याय यांनी आग्रा, फतेहपूर सीकी, अलिगडसह अनेक जागांवरील उमेदवारांना विरोध केला आहेत. तसेच, विरोधी पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला होता, असे बहुजन समाज पक्षाचे महासचिव मेवालाल गौतम यांनी सांगितले.
रामवीर उपाध्याय यांना तात्काळ पक्षातून निलंबित करण्यात आले असून विधानसभेतील बसप संपर्क नेतेपदावरुनही त्यांना हटविण्यात येत आहे. तसेच, आता पार्टीच्या कोणत्याही बैठकीत त्यांची सामील होणार नाहीत किंवा त्यांना बोलविले जाणार नाही, असेही मेवालाल गौतम यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रामवीर उपाध्याय भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, ते स्वत: बहुजन समाज पक्ष सोडणार नव्हते. कारण, त्यांची आमदारकी धोक्यात आली असती. परंतू, आता मायावतींच्या कारवाईनंतर रामवीर उपाध्याय भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांकडून निकालांचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. यामध्ये एबीपी न्यूज आणि नेल्सनने केलेल्या सर्व्हेमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या आघाडीला 56 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, भाजपाला केवळ 22 जागा मिळतील असा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत 73 जागा जिंकणाऱ्या भाजपाला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आजतक आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार रामवीर उपाध्याय यांनी विरोध केलेल्या जागांवर भाजपाचा विजय होण्याची शक्यता वर्तविली आहे. आग्रा, फतेहपूर सीकरी, अलिगड आणि हाथसरमध्ये भाजपा येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बहुजन समाज पक्षाने रामवीर उपाध्याय यांच्यावर कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.