"सरकारला बिहारच्या निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 02:46 AM2020-08-15T02:46:58+5:302020-08-15T02:47:13+5:30
मायावती यांचा सवाल : कोरोना, पुरामुळे जनजीवन विस्कळीत
लखनौ : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि बिहारातील नितीशकुमार सरकार यांच्यावर बिहार निवडणुकांच्या निमित्ताने बसपा नेत्या मायावती यांनी जोरदार शरसंधान केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना बिहारातील निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का, असा सवाल मायावती यांनी केला आहे.
मायावती यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, बिहारातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. लाखो गरीब कुटुंबांची कोरोना महामारी आणि पुरामुळे पूर्ण वाताहत झाली आहे. लोक मेटाकुटीला आले आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. तथापि, त्यांना मदत पोहोचविण्याच्या बाबतीत सरकार पूर्णत: उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
मदतीचा अभाव हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे. संतप्त झालेले लोक आमदारांना ओलीस धरीत आहेत. परिस्थिती इतकी विकोपाला गेली असली तरीही सरकार उदासीन आणि बेजाबदारच आहे. ही बाब अत्यंत दु:खदायक आणि अमानवी आहे. बिहारात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. कोरोना महामारीची परिस्थितीही राज्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी केंद्र व राज्य सरकारांवर टीकास्त्र सोडले आहे.
सर्वच पातळ्यांवर सरकारची बेशिस्त
अन्य एका टष्ट्वीटमध्ये मायावती यांनी म्हटले आहे की, बिहार निवडणुका अत्यंत जवळ आलेल्या असताना जनतेच्या हिताबाबत तेथील सरकारकडून प्रत्येक पातळीवर बेशिस्तीचे आणि उदासीनतेचे प्रदर्शन केले जात आहे. ही बाब आश्चर्यकारक आहे. अशा वेळी एकच प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो की, विधानसभेच्या निवडणुका केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांना वेळेवर घ्यायच्या नाहीत का?