Mayawati vs BJP: "असे प्रकार वाढत गेल्यास आपला देश दुर्बल होत जाईल"; मायावतींचा भाजपाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 01:26 PM2022-05-18T13:26:35+5:302022-05-18T13:30:17+5:30
मायावतींनी भाजपा नेतृत्वावर सडकून टीकाही केली
Mayawati vs BJP: बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी बुधवारी भाजपा नेतृत्वावर सडकून टीका केली. भाजपाचे लोक गरिबी, बेरोजगारी, महागाई आणि इतर गंभीर समस्यांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्याच्या उद्देशाने धार्मिक मुद्द्यांचा वापर करत आहेत, असं मत मायावती यांनी व्यक्त केलं. तसेच, अशा प्रकारच्या गोष्टींमुळे देश दुर्बल होईल आणि धार्मिक स्थळांची किंवा जागांची नावं बदलल्याने धर्माधर्मांत द्वेष वाढेल, अशी भीतीही मायावतींनी व्यक्त केली.
"सध्या भारतात वाढत जाणारी गरिबी व बेरोजगारी तसेच वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव, महागाई असे अनेक विषय आहेत. पण केंद्र सरकार मुद्दाम त्या विषयांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या संस्था जाणूनबुजून धर्माशी संबंधित ठिकाणे आणि विषयांबद्दल आवाज उठवत आहेत. मूळ प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी त्यांचा हा प्लॅन आहे आणि हे कोणापासूनही लपलेलं नाही", असं मायावती म्हणाल्या.
"असे प्रकार अशाच प्रकारे वाढत गेले तर परिस्थिती चिघळेल. स्वातंत्र्याच्या नंतर इतक्या वर्षांनीही लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ केला जात आहे. कट रचल्याप्रमाणे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्यानवापी, मथुरा, ताज महाल ही त्याचीच काही उदाहरणं आहेत असं म्हणता येईल. असे प्रकार घडवल्याने तुम्ही भारताला कमकुवत करत आहात. याकडे भाजपाला गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे", असा इशाराही मायावतींनी दिला.