मायावतींचा मोठा निर्णय, आकाश आनंदला सर्व पदांवरुन हटवले; म्हणाल्या- 'मी जिवंत असेपर्यंत..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 15:25 IST2025-03-02T15:24:54+5:302025-03-02T15:25:10+5:30
बसपच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मायावतींचा मोठा निर्णय, आकाश आनंदला सर्व पदांवरुन हटवले; म्हणाल्या- 'मी जिवंत असेपर्यंत..'
BSP Mayawati :उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टी (BSP) च्या प्रमुख मायावती यांनी पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. रविवारी बसपच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मायावती यांनी भाचा आकाश आनंदला सर्व पदांवरुन हटवले आहे. तसेच, भाऊ आनंद कुमार यांच्याकडे आता राष्ट्रीय समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय रामजी गौतम यांनाही बसपचे राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आले आहे. म्हणजेच, आता बसपमध्ये दोन राष्ट्रीय समन्वयक असणार आहेत.
मी जिवंत असेपर्यंत कोणालाही उत्तराधिकारी बनवणार नाही
मायावतींच्या निर्णयानुसार आकाश आनंद यापुढे पक्षात कोणतेही पद भूषवणार नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मायावतींनी त्यांचे जुने विश्वासू आणि जवळचे मित्र अशोक सिद्धार्थ यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. ते आकाश आनंदचे सासरे आहेत. दरम्यान, मायावतींनी हयात असेपर्यंत कोणालाही आपला उत्तराधिकारी घोषित करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. माझ्या नावाचा गैरवापर करुन पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना तत्काळ हाकलून दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सांसद रामजी गौतम जी और मान्य आनन्द कुमार जी राष्ट्रीय उपाध्यक्ष को “नेशनल कोऑर्डिनेटर” बनाया गया । बहुत बहुत बधाई एवं शुभकामनाएँ pic.twitter.com/vIeVSkHbdY
— BSP (@Bsp4u) March 2, 2025
अशोक सिद्धार्थने आकाशची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केली
बसपा प्रमुख पुढे म्हणाल्या, आपल्याला यापुढे सर्व गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे लागेल. अशा स्थितीत पक्षाच्या चळवळीच्या हितासाठी आकाश आनंद यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांपासून वेगळे करण्यात आले आहे. यासाठी पक्ष नाही, तर त्याचे सासरे अशोक सिद्धार्थ हे पूर्णपणे जबाबदार आहेत. त्यांनी पक्षाचे नुकसान केले, आकाश आनंदची राजकीय कारकीर्दही बिघडवली आहे. त्यांच्या जागी आनंद कुमार पूर्वीप्रमाणेच पक्षाची सर्व कामे करत राहतील, असे मायावतींनी स्पष्ट केले.
बहुजन समाज पक्षाच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्ली, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड, राजस्थान, महाराष्ट्र यासह अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. पक्षसंघटना मजबूत व्हावी, जनाधार वाढावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण, या बैठकीला मायावती यांचे पुतणे आकाश आणि ईशान उपस्थित नव्हते.
गेल्या वर्षी आकाशला मोठा धक्का दिलेला
बसपा सुप्रिमोने डिसेंबर 2023 मध्ये आकाश आनंदला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. पण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावतींनी आपला निर्णय मागे घेतला. मे महिन्यात त्यांनी त्यांचा आकाश आनंद याला बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आणि उत्तराधिकारी पदावरून हटवले. आकाश आनंद पूर्ण परिपक्व होईपर्यंत त्याला दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवण्यात येईल, असे त्या म्हणाल्या होत्या.