Arvind Kejriwal : "मी जगातला सर्वात स्वीट दहशतवादी", अरविंद केजरीवालांकडून विरोधकांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 02:32 PM2022-02-18T14:32:38+5:302022-02-18T14:35:39+5:30
Arvind Kejriwal : कुमार विश्वास यांच्याबद्दल अरविंद केजरीवाल म्हणाले की, ते हास्यकवी आहेत, ते काहीही बोलू शकतात. त्याची पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी गंभीर दखल घेतली होती.
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी कवी आणि माजी आप नेते कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी केलेल्या आरोपांवर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. कुमार विश्वास यांच्याबद्दल अरविंद केजरीवाल म्हणाले की, ते हास्यकवी आहेत, ते काहीही बोलू शकतात. त्याची पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी गंभीर दखल घेतली होती.
अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मोदीजी, प्रियंका गांधी, राहुल गांधी हे सगळेच म्हणत आहेत की, गेल्या 10 वर्षांपासून केजरीवाल देशाचे दोन तुकडे करण्याचा विचार करत आहेत आणि त्यांना एका तुकड्याचे पंतप्रधान व्हायचे आहे. हे होऊ शकते का? हा विनोद आहे, याचा अर्थ मी मोठा दहशतवादी झालो आहे. 10 वर्षात 3 वर्षे कॉंग्रेसचे सरकार होते, 7 वर्षे भाजपचे सरकार होते. इतक्या वर्षांत त्यांनी मला अटक का केली नाही? त्यांची सुरक्षा एजन्सी काय करत होती आणि हे लोक झोपले होते का?' असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.
I am probably the sweetest terrorist in the world -- the one who builds hospitals, schools, & roads; sends the elderly to pilgrimage and gives free electricity to people: AAP chief and Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/R4BarnLXns
— ANI (@ANI) February 18, 2022
शाळा, हॉस्पिटल (School, Hospital) बांधणारा मी जगातला सर्वात गोड दहशतवादी आहे आणि असा दहशतवादी जगात कधीच जन्माला आला नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. तसेच, सर्वात आधी मला राहुल गांधींनी दहशतवादी म्हटले, पण लोक त्यांना गंभीर मानत नसल्याने लोकांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रियंका गांधी आणि सुखबीर सिंग बादल यांनीही हीच भाषा वापरली. मात्र, पंतप्रधानही राहुल गांधींची नक्कल करतील, असे वाटले नव्हते, असे लोक आज म्हणत आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी विरोधकांवर केली.
'सर्व पक्षांनी पंजाब लुटला'
याचबरोबर, अरविंद केजरीवाल म्हणाले, 'पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. 70 वर्षांपासून सर्वच पक्षांनी पंजाबला लुटले, मुलांना बेरोजगार केले. ते पुढे म्हणाले, 'पंजाबवर 3 लाख कोटींचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. त्यांनी काही केले नाही तर हा पैसा गेला कुठे? शाळा बांधली नाही, दवाखाना बांधला नाही, कॉलेज बनवले नाही, काम केले नाही.
'दिल्लीप्रमाणे पंजाबमध्ये काम करू'
दिल्लीत चांगल्या शाळा आणि रुग्णालये बांधली पाहिजेत, असे आम्ही म्हणत आहोत. आमचे सरकार बनले तर आम्ही पंजाबमध्येही बनवू. दिल्लीतील 10 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. पंजाबमध्ये प्रामाणिक सरकार आणले जाईल. संपूर्ण यंत्रणा आपल्या विरोधात उभी आहे. पंजाबचे 3 कोटी पंजाबी एकत्र येऊ शकत नाहीत का? ते कोणत्याही पक्षाचे असले तरी आपल्याला संपूर्ण व्यवस्थेचा पराभव करायचा आहे. यावेळी प्रामाणिक पंजाबला मतदान करा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना केले.