काटोलचे नगराध्यक्ष, ११ नगरसेवक अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2016 12:27 AM2016-02-23T00:27:35+5:302016-02-23T00:27:35+5:30
नगर परिषदेतील काँक्रिट रस्ते दुरुस्ती व नाली बांधकामासह २९ कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत नगराध्यक्षांसह ११ नगरसेवकांना सहा वर्षांसाठी
काटोल : नगर परिषदेतील काँक्रिट रस्ते दुरुस्ती व नाली बांधकामासह २९ कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत नगराध्यक्षांसह ११ नगरसेवकांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हा आदेश काढला आहे.
तत्कालीन नगराध्यक्ष सरला विश्राम उईके, तत्कालीन उपाध्यक्ष तथा विद्यमान नगराध्यक्ष राहुल वीरेंद्र देशमुख, आशा शंकर राऊत, शोभा अशोक जवंजाळ, नलिनी कैलास लारोकर, नानाजी रामजी वंजारी, सुरेश चंपतराव पर्बत, गीता महेश चांडक, राजेश सुखदेव डेहनकर आणि गिरीश धनराज पालीवाल यांचा अपात्र नगरसेवकांमध्ये समावेश आहे.
जितेंद्र नेमलालजी तुपकर यांनी २४ जुलै २०१३ मध्ये त्याबाबत तक्रार केली होती. नगर परिषदेच्या प्रभाग क्र. २, ३, ४ आणि ५ मधील काँक्रिट रस्ते दुरुस्ती व नाली बांधकाम अशी एकूण २९ कामे २५ हजार ते ४० हजार या मर्यादेत विभागण्यात आली. सदर काम हे नोंदणीकृत व अर्हताप्राप्त असलेल्या कंत्राटदाराला देण्याऐवजी अनुभव नसलेल्या कंत्राटदारास देण्यात आले. शासनाने त्याची दखल घेऊन १९ आॅगस्टला चौकशी अधिकारी नियुक्त केले होते. त्याचा अहवाल ३१ डिसेंबर २०१३ला अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. त्यांनी २५ फेब्रुवारीला नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला. त्याची ९ जून २०१५ मध्ये अंतिम सुनावणी झाली. मात्र उच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारीपूर्वी निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी हा आदेश जारी झाला.