महापौरांकडून शंभर कोटींची मागणी कुंभपर्व सांगता : साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागेचा आग्रह
By admin | Published: August 12, 2016 12:04 AM2016-08-12T00:04:55+5:302016-08-12T01:30:45+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वाच्या सांगता सोहळ्यात महापौर अशोक मुर्तडक यांनी नाशिकच्या मूलभूत गरजांसाठी आणखी शंभर कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. साधू-महंतांनीही साधुग्रामसाठी तपोवनात कायमस्वरूपी जागेची मागणी करत घोषणा होऊनही त्याची पूर्तता न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली.

रामकुंडालगत कपालेश्वर मंदिरासमोरील पटांगणात आयोजित सांगता समारंभात महापौर अशोक मुर्तडक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, महापालिकेने केलेल्या नियोजनामुळे कुंभमेळा यशस्वी झाला. महाराष्ट्र शासनही महापालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पालकमंत्र्यांसह स्थानिक आमदारांनी खांद्याला खांदा लावून काम केले. सिंहस्थ यशस्वीतेचे सारे श्रेय नाशिककरांकडे जाते. पर्वणीकाळात अनेक हालअपेष्टा सहन करत त्यांनी कुंभमेळा यशस्वीतेसाठी हातभार लावला. स्वयंसेवी संस्थांनीही पुढे येत मदतीचा हात दिला. मात्र, महापालिकेला शासनाने दिलेला सिंहस्थ निधी अपुरा पडला. महापालिकेला आणखी १०० कोटींची नितांत गरज आहे. जकात बंद झाली. एलबीटीपासून तुटपुंजे उत्पन्न प्राप्त होत आहे. अशा स्थितीत सिंहस्थाची उर्वरित कामे करताना महापालिकेची दमछाक होत आहे. नाशिककरांच्या मूलभूत गरजा बाजूला ठेवत महापालिकेने त्यांच्याकडूनच मिळालेला कररुपी पैसा सिंहस्थ कामांसाठी वापरला. त्यामुळे शासनाने आता महापालिकेला वाढीव शंभर कोटी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी विनंतीही महापौर अशोक मुर्तडक यांनी केली.