MCD Mayor Election : अखेर दिल्लीला मिळाला नवीन महापौर; मनीष सिसोदिया म्हणाले- 'गुंडांचा पराभव, जनतेचा विजय...'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 02:30 PM2023-02-22T14:30:22+5:302023-02-22T14:30:52+5:30
MCD Mayor Election : आम आदमी पक्षाच्या 39 वर्षीय शैली ओबेरॉय दिल्लीच्या महापौर झाल्या आहेत.
MCD Mayor Election 2023: अनेक दिवसांच्या गोंधळानंतर आज अखेर दिल्ली महानगरपालिका म्हणजेच एमसीडीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक शांतेत पार पडली. यात आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या आहेत. शेली ओबेरॉय या दिल्लीच्या पटेल नगर विधानसभेच्या वॉर्ड क्रमांक 86 मधील नगरसेवक आहेत. 39 वर्षीय शैली ओबेरॉय या व्यवसायाने प्राध्यापक आहेत.
बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास मतदानाला सुरुवात झाली आणि 2 तासांपेक्षा जास्त वेळ मतदान चालले. यानंतर दुपारी दोनच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एकूण 10 नामनिर्देशित खासदार, 14 नामनिर्देशित आमदार आणि निवडून आलेल्या 250 पैकी 241 नगरसेवकांनी मतदान केले. आम आदमी पक्षाचे सभागृह नेते मुकेश गोयल यांच्या विनंतीवरुन महापौरपदाच्या निवडणुकीत वेळ वाचवण्यासाठी दोन बूथमध्ये मतदान सुरू करण्यात आले होते.
गुंडे हार गये, जनता जीत गयी.
— Manish Sisodia (@msisodia) February 22, 2023
दिल्ली नगर निगम में आम आदमी पार्टी का मेयर बनने पर सभी कार्यकर्ताओं को बहुत बधाई और दिल्ली की जनता का तहे दिल से एक बार फिर से आभार.
AAP की पहली मेयर @OberoiShelly को भी बहुत बहुत बधाई.
या विजयानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले. त्यांनी लिहिले - 'गुंडांचा पराभव झाला, जनता जिंकली. दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाचा महापौर झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा दिल्लीच्या जनतेचे मनापासून आभार. AAP च्या पहिल्या महापौर शैली ओबेरॉय यांचे अभिनंदन,' असे ट्विट त्यांनी केले.
दोन महिन्यांपूर्वी झाली निवडणूक
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी 4 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली MCD च्या 250 जागांवर मतदान झाले होते आणि निकाल 7 डिसेंबरला आला होता. यामध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले होते. आम आदमी पक्षाने 250 पैकी 134 जागा जिंकल्या होत्या, तर भारतीय जनता पक्ष 104 जागांवर घसरला होता. यापूर्वी 6 जानेवारी, 24 जानेवारी आणि 6 फेब्रुवारीला महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बैठका झाल्या, पण सभागृहात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोठा गोंधळ घातला.
त्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि आमदार आतिशी यांनी पक्ष हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेणार असल्याचे सांगितले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एमसीडीची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच उपमहापौरपदासाठी आपकडून आलेले मोहम्मद इक्बाल आणि भाजपकडून कमल बागडी हे उमेदवार होते. स्थायी समिती सदस्यपदासाठी आपचे आमिल मलिक, सारिका चौधरी, मोहिनी जिनवाल आणि रामिंदर कौर आणि भाजपकडून कमलजीत सेहरावत, गजेंद्र दराल आणि पंकज लुथरा हे उमेदवार होते.