करतारपूर कॉरिडोरचं निमित्त साधून काश्मीरवर बोलणं अयोग्य, सुषमा स्वराजांचं इम्रान यांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 08:44 PM2018-11-28T20:44:33+5:302018-11-28T20:44:44+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते करतारपूर कॉरिडोरचे पाकिस्तानच्या बाजूनं भूमिपूजन करण्यात आले आहे.
नवी दिल्ली- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते करतारपूर कॉरिडोरचे पाकिस्तानच्या बाजूनं भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यावेळी इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर विवादावर भाष्य केलं आहे. भारत पाकिस्तानमध्ये फक्त काश्मीर मुद्द्यावरून भांडण सुरू आहे. दोन्ही सरकारांनी एकत्र येऊन चर्चा केल्यास हाही प्रश्न मार्गी लागेल. जर जर्मनी आणि फ्रान्स एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का नाही ? असे म्हणत खान यांनी भारताला मैत्रत्वाचा सल्ला दिला होता. त्यानंतर भारतानंही इम्रान खान यांच्यावर पलटवार केला आहे.
इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये खऱ्या वादाचं कारण काश्मीर असल्याचं आता स्पष्टच केलं आहे. या धार्मिक कार्यक्रमात इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानंही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्ताननं पहिल्यांदा स्वतःच्या धरतीवरून होणाऱ्या दहशतवादाला आळा घालावा आणि मग इतर विषयांवर बोलावे. पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवर होणाऱ्या दहशतवादाला पहिल्यांदा रोखलं पाहिजे. यासाठी त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. त्यानंतर इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं निषेध नोंदवला आहे. करतारपूर गुरुद्वारा कॉरिडोरच्या भूमिपूजनावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणं चुकीचं आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या कार्यक्रमादरम्यान त्या मुद्द्याचा उल्लेख करणं दुर्दैवी आहे.
या कॉरिडोरच्या निमित्तानं खलिस्तान समर्थक बंडखोर गोपाल सिंग चावला आणि पाकिस्तान सेनेचे प्रमुख कमर जावेद बावजा यांच्या भेटीवर आक्षेप नोंदवला आहे. भारतानं या प्रकारावर निषेध नोंदवला आहे. परंतु पाकिस्ताननं याचं समर्थन केलं आहे. शांतीसाठी केलेल्या प्रयत्नांना कोणीही विरोध करू नये, असंही पाकिस्तान सेनेचे प्रवक्ते आसिफ गफूर म्हणाले आहेत.