India China Face Off: चीनचा दुटप्पीपणा आता खपवून घेतला जाणार नाही, जशास तसे उत्तर मिळेल; भारताचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 01:10 PM2022-01-05T13:10:28+5:302022-01-05T13:12:02+5:30
India China Face Off: चीनला प्रत्युत्तर म्हणून पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी तिरंगा फडकावून नववर्षांचे स्वागत केले.
नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये सीमारेषेवरून लडाखमधील गलवान खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. यातच, चिनी प्रसारमाध्यमांनी त्यांचे सैनिक गलवान खोऱ्यानजीक त्यांच्या बाजूकडे त्यांचा ध्वज फडकावित असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी तिरंगा फडकावून नववर्षांचे स्वागत केले. यानंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला आता थेट इशारा दिला असून, चीनचा दुटप्पीपणा आता खपवून घेतला जाणार नाही, ड्रॅगनला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.
गलवान खोऱ्यात चीनने राष्ट्रध्वज फडकवल्याबाबत परराष्ट्रमंत्री मीनाक्षी लेखी यांनी तीव्र आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली होती. भारतीय जवानांचे तेथील परिस्थितीवर नियंत्रण आहे. मात्र, यावर मी अधिक काही बोलणार नाही. चीनला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. चीनने तिथे काही कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असे मीनाक्षी लेखी यांनी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधींवर साधला निशाणा
अलीकडेच राहुल गांधी यांनी ट्विट करत भारत आणि चीनच्या सीमा संघर्षावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. याबाबत मीनाक्षी लेखी यांना विचारले असता, अशा ट्विट्सवर मी प्रतिक्रिया देत नाही, असे सांगत लेखी यांनी राहुल यांच्या ट्विटवर काही बोलण्यास नकार दिला. मात्र, त्यांची (राहुल गांधी) यांची मातोश्री थायलँड येथे चिनी लोकांच्या भेटी-गाठी घेतात. यावर ते आता काय बोलणार आहेत, अशी टीका लेखी यांनी केली.
दरम्यान, कडाक्याच्या हिवाळ्यातही पूर्व लडाखच्या प्रत्येक बाजूला सैन्याची मोठी उभारणी हे सूचित करते की, संघर्ष कमी होण्याची शक्यता नाही. भारताने असे म्हटले आहे की प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) स्थिती चीनच्या बाजूने स्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांमुळे आणि द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केल्यामुळे उद्भवली आहे. चीनने या भागात ६० हजार सैनिक तैनात केले असून, भारतानेही तेवढेच जवान तैनात केले असल्याचे सांगितले जात आहे.