घरातील स्वच्छतागृहासाठी ११ वर्षाच्या मुलीने सोडले जेवण
By admin | Published: April 27, 2015 08:48 AM2015-04-27T08:48:32+5:302015-04-27T08:58:07+5:30
मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्यातील ११ वर्षाच्या ताराने घरात वडिलांनी स्वच्छतागृह बांधावा यासाठी दोन दिवस उपोषण केल्याची घटना समोर आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. २७ - मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्यातील ११ वर्षाच्या ताराने घरात वडिलांनी स्वच्छतागृह बांधावा यासाठी दोन दिवसासाठी उपोषण केले. पैशाअभावी ताराच्या वडिलांना स्वच्छतागृह बांधता येत नव्हते, अखेरीस स्थानिक प्रशासनाने आर्थिक मदत दिल्याने ताराच्या घरातील स्वच्छतागृहाचे काम सुरु झाले आहे. सागर जिल्हा प्रशासनाने स्वच्छता मोहीमेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ताराची नियुक्ती केली आहे.
सागर जिल्ह्यातील किरोड गावात राहणारी तारा बन्सल ही गावातील सरकारी शाळेत सहावी इयत्तेत शिकते. काही दिवसांपूर्वी ताराच्या शाळेत एका समाजसेवी संस्थेने स्वच्छतेसंदर्भात जनजागृती अभियान राबवला होता. उघड्यावर शौचालयास जाऊ नये असा संदेशही या अभियानातून देण्यात आला होता. तारा या अभियानामुळे प्रभावित झाले व तिने घरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी तगादा लावला. ताराचे वडिल महेश आणि काका पुरुषोत्तम हे दोघे शेतमजूर म्हणून काम करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने बन्सल कुटुंबाच्या घरात स्वच्छतागृह नव्हते. यामुळे तारा व घरातील अन्य महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. चिमुकल्या ताराने या विरोधात लढा देण्याचा निर्धार करत दोन दिवस अन्नाचा एक कणही घेतला नाही. वडिलांनी आधी घरात शौचालय बांधावे असे तिचे म्हणणे होते. मुलीच्या हट्टाखातर महेश बन्सल यांनी शौचालयाचे बांधकाम सुरु केले. मात्र पैशाअभावी ते बंद पडले. अखेर जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती समजली व त्यांनी ताराच्या घरी जाऊन शौचालय बांधण्यासाठी मदत दिली. पहिल्या टप्प्यात आम्ही सहा हजार रुपये दिले असून उर्वरित पैसे बांधकाम पूर्ण झाल्यावर देऊ असे स्थानिक अधिका-यांनी सांगितले.