तुघलकी उपाययोजना!
By admin | Published: May 18, 2017 01:46 PM2017-05-18T13:46:41+5:302017-05-18T14:17:27+5:30
पृथ्वी आणि मानवाची वेळ जलदगतीने संपत आहे या ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या दाव्यावर प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. बाळ फोंडके यांनी मांडलेले विचार.
-डॉ. बाळ फोंडके
भाकित करणं हा वैज्ञानिकांचा धर्मच आहे. एकोणिसावं शतक सरता सरता सुरु झालेल्या भौतिक शास्त्राच्या सुवर्णयुगात तर प्रत्यही नवनवी भाकितं केली जात होती. मुख्यत्वे गणिताच्या आधारावर त्यांची घोषणा केली गेली असली तरी त्यांचा पडताळा घेण्यासाठी आणि सत्यासत्यता अजमावण्यासाठी प्रयोगांची आखणीही तातडीनं हाती घेतली जात होती. त्यातूनच विश्वातील तोवर अज्ञात असलेल्या अनेक घटकांवर आणि प्रक्रियांवर प्रकाश टाकला गेला होता. दस्तुरखुद्द आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादामध्येही अशी किती तरी भाकितं दडलेली होती. त्यांचा पाया असलेलं गणित अचूक असलं तरी ती भाकितं प्रत्यक्षात खरी ठरतात की काय यांचा धांडोळा इतरेजन घेत होते. त्यातलंच एक भाकित होतं की गुरुत्त्वाकर्षणाच्या प्रभावापोटी प्रकाशाला आपला नाकासमोर सरळ रेषेत जाण्याचा बाणा सोडून वाकावं लागेल. त्याची प्रचिती आर्थर एडिन्ग्टननं त्यानंतर तीन चार वर्षांनी एका खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी एका कल्पक प्रयोगाद्वारे मिळवली. त्यानंतरच आईन्स्टाईनच्या नोबेल पुरस्काराचा मार्ग मोकळा झाला.
तेव्हा भविष्यवेध घेणं वैज्ञानिकांना नवीन नाही. पण त्याला जोवर गणिताचा भरभक्कम आधार होता तोवर त्यांच्याविषयी सामान्यजनांना काही शंका येण्याचं किंवा चिंता वाटण्याचं प्रयोजनच नव्हतं. पण आता ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ आणि विश्वरचनावैज्ञानिक स्टीफन हॉकिन्ग यांनी केलेल्या भविष्यवाणीपायी किमानपक्षी प्रसारमाध्यमं तरी खडबडून जागी झालेली दिसताहेत. त्यात हॉकिन्गच्या भविष्यवाणीतल्या खळबळजनक विधानाला प्रसिद्धी देण्याचा मोह किती आणि मानवजातीच्या भवितव्याविषयीच्या वास्तव काळजीचा वाटा किती हा विवादास्पद प्रश्न आहे.
एखाद्या वलयांकित व्यक्तिनं केलेल्या वक्तव्यावर विश्वास टाकण्याची आपली सहजप्रवृत्ती असल्यामुळं हॉकिन्ग यांच्या या भयसूचक विधानापोटी कोणीही हडबडून जाण्याची शक्यता आहे. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अवलंब करायचा तर त्यांच्या या भाकिताची वस्तुनिष्ठ चिकित्सा होणं आवश्यक आहे. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी या येऊ घातलेल्या समस्येवर जो तोडगा सुचवला आहे त्याची तर सखोल तपासणी करायला हवी. कारण हॉकिन्ग यांनी मानवजातीनं कोणत्या तरी परग्रहावर वस्ती करण्याची तयारी करायला हवी अशी सूचना केली आहे.
हॉकिन्ग यांच्या या भविष्यकथनाला गणिताचा कितपत आधार आहे, हे सांगणं कठिण आहे. कारण त्यांनी तापमानवाढीच्या आलेखाचं जे भविष्यातलं प्रक्षेपण केलं आहे ते तो आलेख सरळ रेषेत वरवर जात राहील हे गृहीत धरलं आहे. मानवजातीच्या भवितव्याबद्दल आजवर अशी जी काही भाकितं केली गेली होती त्यातली या प्रकारची गृहीतं विवादास्पद ठरल्याचा अनुभव आहे. १९६० च्या दशकात क्लब ऑफ रोम या काही विचारवंतांनी स्थापन केलेल्या मंचानंही येत्या काही वर्षात माणसाची अन्नान्नदशा होईल अशी भीती व्यक्त केली होती. ती प्रत्यक्षात उतरली नाही, कारण अन्नधान्याचं उत्पादन लक्षणीय रीत्या वाढविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रचली गेली होती. आणि आज साठवर्षांनंतर जग अन्नधान्याच्या बाबतीत सुरक्षित झालं असल्याचाच प्रत्यय मिळत आहे. अन्नधान्याचे साठे पर्याप्त आहेत. उणीव भासते ती त्याच्या समान वितरणाची आणि योग्य त्या क्रयशक्तिची. पण त्यावरही उपाययोजना होत आहे.
यातला तापमानवाढीच्या संकटाचा सामना आजच करावा लागत असला तरी त्याची तीव्रता कमी करण्याची आणि त्या संकटावर उपाययोजना करण्याची धडपड जगभर चाललीच आहे. रियो प्रोटोकॉल किंवा अलीकडेच पॅरिस इथं भरलेल्या परिषदेतील प्रस्ताव या दिशेनं सारं जगच कसून प्रयत्न करत असल्याचं दिसतं आहे. त्यांची अंमलबजावणी अधिक निकडीनं आणि वेगानं होण्याची आवश्यकता आहे, याविषयी संदेह नाही.
उल्कावर्षावाचा मुद्दा मात्र तेवढासा विश्वासार्ह वाटत नाही. तसं पाहिलं तर वर्षभर उल्कावर्षाव होतच असतो. काही विशिष्ट कालावधीत त्याचा जोर वाढतो. आणि रात्रीच्या वेळी असा धुवांधार उल्कावर्षाव आपल्याला सहजगत्या दिसतो. यातील बहुतांश उल्का पृथ्वीच्या वातावरणात शिरल्याशिरल्या जळून खाक होतात. ज्या जमिनीपर्यंत पोचतात त्यांचं आकारमानही जेमतेमच असतं. प्रचंड उंचीवरून आल्यामुळं त्यांच्या आघातमात्रेत वाढ झालेली असली तरी धरतीचं फार मोठं नुकसान करण्याची क्षमता त्यांच्यात नसते. पासष्ट कोटी वर्षांपूर्वी झालेल्या महाभयंकर उल्कापातापायी त्या काळी सर्वत्र भरभराटीला आलेली डायनोसॉरची प्रजाती नष्ट झाली. पण त्यानंतरच्या काळात तशा प्रकारचं उल्कातांडव झालेलं नाही. त्यामुळं पुढील शंभर वर्षांमध्ये अशा प्रकारचा उत्पाती उल्कावर्षाव होण्याची भीती हॉकिन्गना का वाटते हे अनाकलनीय आहे.
या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी त्यांनी सुचवलेला तोडगा अंमलात कसा आणायचा हा तर यक्षप्रश्नच आहे. धरती सोडून स्थलांतर करत मानवानं इतर कोणत्या तरी ग्रहावर वस्ती करायची तर माणसाच्या सद्यप्रकृतीला मानवेल अशा कोणत्याही ग्रहाचा शोध अजून तरी लागलेला नाही. नजीकच्या भविष्यकाळात तो लागण्याची शक्यताही दिसत नाही.
आणि समजा असा सापडला तरी तिथपर्यंत सदेह मजल मारण्याची क्षमता आपल्याकडे आहे का? स्पुटनिक या पहिल्यावहिल्या उपग्रहाचं प्रक्षेपण करून माणसानं अंतरिक्षात पाऊल टाकल्याला आज साठ वर्षं झाली. या कालावधीत त्यानं मारलेली मजल डोळे विस्फारणारी असली तरी अजूनही सदेह प्रवास फार फार तर आपलाच उपग्रह असलेल्या चंद्रापर्यंतच झाला आहे. त्यासाठीही तिथं गेलेल्या व्यक्तिंना विशिष्ट पोशाख चढवावा लागतो. त्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. आणि मुख्य म्हणजे अन्न आणि पाणी यांची इथूनच बेगमी करून न्यावी लागते. तिथला मुक्काम आजवर दोन चार दिवसांचा राहिल्यामुळं ते शक्य झालं आहे. पण कायमची वस्ती करायची तर त्याची सोय कशी करायची हा सवालही त्रस्त समंधासारखा छळणारा आहे.
नाही म्हणायला अंतराळस्थानकांमध्ये काही अंतराळवीर सहासहा महिने तळ ठोकून राहिलेले आहेत. पण त्यासाठीही त्या स्थानकांमध्ये कृत्रिम रीत्या पोषक वातावरण तयार करावं लागलं आहे. दोनचार अंतराळवीरांसाठी त्याची योजना करणं शक्य आहे. पण सार्या मानवजातीचाच संसार तिथं थाटायचा असेल तर ते शक्य आहे का, या प्रश्नाचं उत्तर हॉकिन्गही देऊ शकतील की काय याविषयी शंका आहे.
पण त्याहूनही एक मोठा सवाल आपल्यापुढं उभा ठाकतो. आज पृथ्वीवर माणूस राहतो, तगतो तो संपूर्णपणे स्वतंत्र एखाद्या बेटासारखा नाही. इथल्या सजीव निर्जीव सृष्टीशी त्याचं एक कळीचं नातं प्रस्थापित झालेलं आहे. ही सर्व चराचर सृष्टी आणि मानवप्राणी यांच्यामध्ये परस्परावलंबी असं एक पर्यावरणीय नेटवर्क बांधलं गेलेलं आहे. ते अतूट राहण्याचीही नितांत आवश्यकता आहे. त्यातली एखादी कडीही विस्कळित झाली तर या समग्र चराचर सृष्टीचा डोलाराचा कोलमडून पडेल.
कित्येक खनिजांचा देहबांधणीला उपयोग होतो. रक्तासाठी लोह लागतं. हाडांसाठी कॅल्शियम. इतरही खनिजं लागतात. इथले सूक्ष्मजीव जमिनीची मशागत करून वनस्पतींच्या वाढीला मदत करतात. एवढंच काय पण आपल्या शरीरात कायमचं वास्तव्य करून राहणारे काही सूक्ष्मजीव अन्नपचनात कळीची भूमिका पार पाडतात. वनस्पतींच्या योगदानाबद्दल काय सांगावं! इतर सर्वच सजीवांचं ते प्राथमिक अन्न आहे. प्राण्यांचीही आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होत असते. दुभती जनावरं दूध पुरवतात. कोंबड्यांसारखे पक्षी अंडी देतात. शेळी, बकरी, मेंढी, बैल डुक्कर या प्राण्यांचा खाद्यपदार्थांसाठी तर थेट उपयोग होतो. एकट्या मानवानं स्थलांतर केलं तर त्या परग्रहावर तो तगू शकेल? त्यासाठी या सर्वच सजीव निर्जीव सृष्टीचा लवाजमा साथीला घेऊनच जाणं योग्य नाही का ठरणार? आणि ते करायचं तर मग एकट्या मानवानं सदेह त्या परग्रहापर्यंत मजल मारून भागणार नाही. पुरातन काळातल्या महाप्रलयापासून वाचण्यासाठी मनूनं किंवा नोहानं एक होडी बांधून त्यातून प्राण्यांचं स्थलांतर घडवून आणलं होतं अशा दंतकथा प्रचलित आहेत. हॉकिन्गनं भविष्यवाणी केल्याप्रमाणे मानवजात नष्ट होण्याचं संकट टाळण्यासाठी त्यांनीच सुचवलेल्या उपाययोजनेनुसार आज एक आधुनिक मनुची नौका बांधून त्यातून यच्चयावत सजीव निर्जीव सृष्टीचा गोतावळा बरोबर घेऊन ती परग्रहापर्यंत वाहून न्यायला हवी. हे कसं साध्य करता येईल याचा तपशील हॉकिन्ग यांनी दिलेला नाही. तो दिला तरी तसं करणं तुघलकी निर्णय ठरण्याचीच जास्ती शक्यता आहे.