प्रदूषणावर उपाय; दिल्लीसह राजधानी क्षेत्रात यंदा फटाक्यांविना दिवाळी, सुप्रीम कोर्टाने पुन्हा लागू केली बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 01:08 AM2017-10-10T01:08:15+5:302017-10-10T01:08:28+5:30
नवी दिल्लीसह संपूर्ण महानगर दिल्ली आणि संपूर्ण राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) शोभेच्या आणि आवाजाच्या अशा दोन्ही प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवरील महिनाभरापूर्वी तहकूब केलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा
नवी दिल्ली : नवी दिल्लीसह संपूर्ण महानगर दिल्ली आणि संपूर्ण राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) शोभेच्या आणि आवाजाच्या अशा दोन्ही प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवरील महिनाभरापूर्वी तहकूब केलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा लागू केल्याने लाखो दिल्लीवासीयांना यंदाची दिवाळी फटाक्यांविना साजरी करावी लागेल.
दिल्लीत थंडीच्या महिन्यांत हवेचे प्रदूषण, श्वास घेणेही मुश्कील व्हावे, एवढे वाढते. दिवाळीत फटाक्यांच्या धुराने परिस्थिती आणखी बिकट होते, याची दखल घेत न्यायालयाने काही नागरिकांनी केलेल्या याचिकांवर दिल्ली आणि ‘एनसीआर’ क्षेत्रात फटाक्यांची विक्री स्थगित करण्याचा आदेश गेल्या वर्षी ११ नोव्हेंबर रोजी दिला होता. त्यानंतर फटाक्यांचे उत्पादक, विक्रेते व परवानाधारक यांनी केलेली विनंती मान्य करून न्यायालयाने विक्रीवरील ही बंदी तहकूब केली होती. मूळ याचिकाकर्ते, स्वयंसेवी संस्था व इतरांनी केलेल्या अर्जांच्या निमित्ताने न्या. ए. के. सिक्री, न्या. अभय मनोहर सप्रे व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने या विषयाचा फेरविचार केला आणि बंदी तहकूब करण्याचा आधीचा निर्णय १ नोव्हेंबरनंतर लागू होईल, असा आदेश दिला.
लाखोंच्या रोजगारावर गदा येईल, फायर क्रॅकर्स असोसिएशनची भीती-
न्यायालयाचा हा निकाल एकतर्फी आणि अन्याय्य आहे. अशा प्रकारे हळूहळू देशभरात फटाक्यांवर बंदी घातली जाईल आणि त्यामुळे या उद्योगावर पोट भरणाºया लाखो लोकांच्या रोजगारावर गदा येईल, अशी भीती तामिळनाडू फायर क्रॅकर्स अॅण्ड अॅमॉरसेस असोसिएशनचे अध्यक्ष असाई तंबी यांनी व्यक्त केली.
देशभरातील ८५ टक्के फटाक्यांचे उत्पादन शिवकाशी आणि परिसरात होते. वर्षाला ही उलाढाल १० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. प्रत्यक्ष फटाक्यांच्या कारखान्यांत तेथे तीन लाख लोक काम करतात. आणखी पाच लाख लोक याच्याशी संबंधित पूरक उद्योग-व्यवसायांवर पोट भरतात. याशिवाय देशभर फटाक्यांची विक्री करणारे लाखो विक्रेते वेगळेच.