"संविधान मला परवानगी देतं..;" नवरात्रीत मांस विक्रीच्या दुकानांवरील बंदीवर TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 03:46 PM2022-04-06T15:46:57+5:302022-04-06T15:47:36+5:30
दक्षिण दिल्लीच्या महापौरांनी नवरात्रीदरम्यान मांस विक्रीच्या दुकानांवरील निर्बंध अधिक कठोरपणे लागू करण्याचं वक्तव्य केलं होतं.
दक्षिण दिल्लीच्या महापौरांनी नवरात्रीदरम्यान मांस विक्रीच्या दुकानांवरील निर्बंध अधिक कठोरपणे लागू करण्याचं वक्तव्य केलं होतं. यावर आता तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा (MP Mahua Moitra) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महुआ मोईत्रा यांनी नवरात्रीच्या काळात दिल्लीतील विविध भागात मांस विक्रीच्या दुकानांवर बंदी घालण्यात आल्याच्या निर्णयावर टीका केली. "मी दक्षिण दिल्लीत वास्तव्यास आहे. संविधानाने मला हवे तेव्हा मांसाहार करण्याची परवानगी दिली आहे आणि दुकानदाराला त्याचा व्यवसाय चालवण्याचेही स्वातंत्र्य दिले आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरद्वारे दिली.
"नवरात्रीच्या काळात मांस विक्रीच्या दुकानांवर बंदी घातली जाईल," असं वक्तव्य दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन यांनी केलं होतं. तसंच तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले असून त्यामुळे कोणाच्याही वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येत नाही, असा दावा त्यांनी केला. "आम्ही सर्व मांस विक्रीची दुकाने कडकपणे बंद करू. जेव्हा त्याची विक्री केली जाणार नाही, तेव्हा ते लोक खाणारही नाहीत," असंही ते म्हणाले होते.
I live in South Delhi.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) April 6, 2022
The Constitution allows me to eat meat when I like and the shopkeeper the freedom to run his trade.
Full stop.
Keeping in view the sentiments of the public, necessary directions may be issued to officers concerned to take action for the closure of meat shops during the 9-day period of Navratri festival from 2nd April to 11th April:Mukkesh Suryaan, Mayor, South Delhi Municipal Corporation pic.twitter.com/VbeMQCie5q— ANI (@ANI) April 4, 2022
"लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही तो निर्णय घेतला आहे. उपवास ठेवणाऱ्या लोकांना यामुळे समस्या निर्माण होत होती. हे कोणाच्याही वैयक्तिक स्वातंत्र्याचं उल्लंघन नाही," असंही सूर्यन एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले होते. "८,९ आणि १० एप्रिलला आम्ही सर्व कत्तलखाने बंद ठेवणार आहोत," असंही ते म्हणाले. तर दुसरीकडे पूर्व दिल्ली महानगरपालिकेचे महापौर श्याम सुंदर अग्रवाल यांनी देखील हीच मागणी केली आहे.