प्रेरणादायी! मेकॅनिकच्या मुलाने कुटुंबाचं नाव केलं मोठं; नाकारली 6 लाखांची ऑफर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 05:03 PM2023-05-02T17:03:48+5:302023-05-02T17:10:47+5:30
एसी मेकॅनिकचा मुलगा रजीनची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे
ध्येय निश्चित असेल तर ते गाठता येतं. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. रजीन मन्सूरी याने देखील मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केलं आहे. एसी मेकॅनिकचा मुलगा रजीनची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. रजीनने कॅट परीक्षेत 99.78 टक्के गुण मिळवून टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर रजीन मन्सुरी याला सहा लाखांच्या नोकरीची ऑफर देण्यात आली होती मात्र त्याने ती नाकारली होती.
2021 मध्ये पहिल्यांदाच रजीन मन्सूरीने कॅट परीक्षेत 96.20 टक्के गुण मिळवले होते. याच आधारावर आयआयएम उदयपूरलाही प्रवेश मिळत होता पण रजीनने पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि कॅट परीक्षेत 99.78 टक्के गुण मिळविले. त्यामुळे आता त्याला आयआयएम कोलकाता या हार्वर्ड, स्टेनफोर्डसारख्या नामांकित संस्थेत प्रवेश घेता आला.
आयआयएम कोलकाता संस्थेची फी 27 लाख रुपये आहे. मात्र, येथे शिकणाऱ्यांसाठी कर्ज सहज उपलब्ध आहे. यासोबतच शिष्यवृत्तीची सुविधाही उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, भविष्यासाठी शिष्यवृत्ती सुरक्षित ठेवत, रजीनला शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून शिक्षण घ्यायचे आहे.
रजीनचे शालेय शिक्षण शेठ सी एन विद्यालयातून झाले आहे. शालेय शिक्षणानंतर त्याने अहमदाबाद विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. रजीनच्या वडिलांचे मासिक उत्पन्न 25 हजार रुपये आहे. यानंतरही त्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"