भन्नाट शोध! प्लास्टिकपासून पेट्रोलची निर्मिती; किंमत फक्त...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 09:35 AM2019-06-26T09:35:28+5:302019-06-26T09:39:59+5:30
हैदराबादमधील मेकॅनिकल इंजिनियरचा शोध
हैदराबाद: बेसुमार प्लास्टिक आणि कमी होत चाललेलं इंधन या समस्यांवर एका मेकॅनिकल इंजिनियरनं रामबाण उपाय शोधला आहे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या प्राध्यापक सतीश कुमार यांनी प्लास्टिकपासून पेट्रोलची निर्मिती केली आहे. यासाठी त्यांनी कंपनीचीही स्थापना केली आहे. अवघ्या तीन टप्प्यांमध्ये प्लास्टिकपासून इंधन करण्याचं तंत्र त्यांनी शोधून काढलं आहे. प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या पदार्थाला सतीश यांनी प्लास्टिक पायरोलिसिस असं नाव दिलं आहे.
प्लास्टिकवर प्रक्रिया करुन त्यापासून डिझेल, पेट्रोल आणि उड्डाण क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या इंधनाची निर्मिती करण्याचं काम आम्ही करतो, असं सतीश यांनी सांगितलं. 'पुनर्प्रक्रिया न होऊ शकणाऱ्या 500 किलो प्लास्टिकपासून 400 लिटर इंधन मिळू शकतं. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून त्यासाठी पाण्याची आवश्यकता भासत नाही. यामधून हवेचं प्रदूषणही होत नाही. कारण एका निर्वात पोकळीत ही संपूर्ण प्रक्रिया केली जाते,' अशी माहिती कुमार यांनी दिली.
प्लास्टिकवर प्रक्रिया करुन इंधनाची निर्मिती करण्यासाठी सतीश यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम मंत्रालयाच्या अंतर्गत कंपनी सुरू केली आहे. 2016 पासून त्यांनी पुनर्प्रक्रिया न होऊ होऊ शकणाऱ्या 50 टन प्लास्टिकचं इंधनात रुपांतर केलं आहे. सध्या त्यांची कंपनी दिवसाला 200 किलो प्लास्टिकपासून 200 लिटर पेट्रोलची निर्मिती करते. चाळीस ते पन्नास रुपये प्रति लिटर दरानं या पेट्रोलची विक्री केली जाते. मात्र अद्याप या इंधनाचा वाहनांमध्ये वापर करण्यात आलेला नाही. या इंधनावर वाहनं चालू शकतात का, याची चाचणी अद्याप शिल्लक आहे.