सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांसह 5 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 08:56 PM2017-08-07T20:56:06+5:302017-08-07T21:00:30+5:30
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना धार पोलिसांनी अटक केली
इंदोर, दि. 7 - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना धार पोलिसांनी अटक केली. मेधा पाटकरांसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे ज्या ४० हजार कुटुंबांची घरे आणि जमिनी पाण्याखाली जाऊ शकतात, त्यांच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मेधा पाटकरांसह अन्य 12 जण चिकलदा येथे आठ दिवसांपासून उपोषण करीत आहेत.
चिकलदामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले असून, त्यांनी आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला आहे. त्यानंतर पोलिसांनी मेधा पाटकरांसह 5 जणांना अटक केली. मध्य प्रदेश सरकारनं माझ्यासोबत 11 जणांना अटक केली आहे. आम्ही गेल्या 12 दिवसांपासून अहिंसात्मक उपोषण करतोय. मोदी सरकार आणि शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारनं ही कारवाई केलीय, आमच्याही काहीही वार्ता न करता ही अटक केली आहे. अशा प्रकारे बळाचा वापर करून महात्मा गांधींच्या अहिंसेच्या स्वप्नाची मध्य प्रदेश सरकारनं हत्या केली आहे, असा आरोप मेधा पाटकरांनी केला आहे. तर मेधा पाटकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती डी. राजा यांनी केली होती.
भाकपाचे राष्ट्रीय सचिव डी. राजा म्हणाले की, या लढाईत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हा मुद्दा आम्ही संसदेत उपस्थित करणार आहोत. मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील आंदोलकांना बळजबरीने हटविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू नये, अशी मागणीही त्यांनी केली होती.
उपोषणामुळे मेधा पाटकर यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सांगून ते म्हणाले की, पाटकर यांनी उपोषण मागे घ्यावे. या आव्हानात्मक परिस्थितीत आम्हाला त्यांची गरज आहे. प्रख्यात अमेरिकी इतिहासकार नोम चोमस्की हे अलीकडेच या प्रकल्पामुळे प्रभावित लोकांच्या समर्थनार्थ पुढे आले होते. त्यांनी एका ऑनलाइन याचिकेवर स्वाक्षरी केली होती. या प्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली होती.
केजरीवाल यांचे विस्थापितांना समर्थन
नर्मदा सरोवरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मध्य प्रदेश सरकारने पुढे यावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केले होते. मेधा पाटकर यांच्या बिघडत्या आरोग्याबाबतही त्यांनी काळजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील भाजपा सरकारने मेधा पाटकर यांच्याशी संपर्कही साधलेला नाही. सरोवराचे दरवाजे बंद करण्यापूर्वी सरकारने विस्थापितांशी चर्चा करायला हवी. या प्रकल्पामुळे बडवानी, धार, अलीराजपूर आणि खरगोन जिल्ह्यांतील हजारो लोकांना आपली घर सोडावी लागणार होते.