मेधा पाटकर यांना पाच महिने कारावास, १० लाखांचा दंड; दिल्ली कोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 06:35 AM2024-07-02T06:35:53+5:302024-07-02T06:36:21+5:30
२३ वर्षांपूर्वीच्या बदनामी खटल्याचा निकाल
नवी दिल्ली - दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी २३ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी पाच महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
हा खटला दाखल झाला तेव्हा सक्सेना गुजरातमधील एका स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख होते. महानगर दंडाधिकारी राघव शर्मा यांनी मेधा पाटकर यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला. निकालाविरोधात अपील करता यावे म्हणून महानगर दंडाधिकाऱ्यांनी मेधा पाटकर यांच्या शिक्षेला एक महिन्यासाठी स्थगिती दिली. प्रोबेशनच्या अटीवर आपली सुटका करण्यात यावी ही मेधा पाटकर यांनी केलेली विनंती दंडाधिकाऱ्यांनी फेटाळली. यासंदर्भात महानगर दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणातील वस्तुस्थिती, दोषी व्यक्तीचे वय, तसेच आजार लक्षात घेता मी त्यांना अधिक शिक्षा देऊ इच्छित नाही.