माध्यमउद्योजक राघव बहल यांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 01:46 AM2018-10-12T01:46:47+5:302018-10-12T01:47:02+5:30
मीडिया क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून राघव बहल यांच्या नॉयडातील घरावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. ही कारवाई विशिष्ट हेतूने केली जात असल्याबद्दल एडिटर्स गिल्डने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : मीडिया क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून राघव बहल यांच्या नॉयडातील घरावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. ही कारवाई विशिष्ट हेतूने केली जात असल्याबद्दल एडिटर्स गिल्डने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
राघव बहल हे नेटवर्क १८ समूह व ‘क्विंट’ या वृत्त संकेतस्थळाचे संस्थापक आहेत. बहल यांनी विविध लाभार्थ्यांकडून बनावट स्वरूपात दीर्घकालीन भांडवली नफा मिळवला, असा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. त्यासंबंधी कागदपत्रांच्या तपासणीसाठी सकाळपासून ही कारवाई सुरू आहे. बहल यांच्याखेरीज जे. लालवानी, अभिमन्यू व अनुप जैन या अन्य तिघांच्या घरांवरही छापा घातला. हे तिघेही या प्रकरणातील लाभार्थी असल्याचा संशय आहे.
छाप्यावेळी बहल हे मुंबईत होते. घरात फक्त आई व पत्नी असून प्राप्तिकर अधिकारी त्यांना कोणाशीही संपर्क साधू देत नाहीत. मी स्वत: दिल्लीला निघालो आहे, असे बहल यांनी सांगितले. या छाप्यात अधिकाऱ्यांनी कुठलाही मेल वा दस्तावेजांची पाहणी करू नये किंवा ते ताब्यात घेऊ नयेत. या दस्तावेजांमध्ये पत्रकारितेशी संबंधित गंभीर व संवेदनशील माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकाºयांनी यापासून स्वत:ला दूर ठेवावे. याबाबत विभागाने योग्य सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे, असे बहल म्हणाले.
प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील घाला
याबाबत एडिटर्स गिल्डने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारला कायद्याच्या अधीन राहून चौकशीचा अधिकार आहे. पण त्या अधिकारांचा वापर सरकारवर टीका करणाºयांना धमकाविण्यासाठी अशा प्रकारे करू नये. बहल यांच्यावरील कारवाईतून हेच दिसते. ही कारवाई विशिष्ट हेतूने प्रेरित असून हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील घाला आहे, असे गिल्डने म्हटले आहे.