मेडिकल प्रवेश ‘नीट’नेच

By admin | Published: April 29, 2016 05:48 AM2016-04-29T05:48:00+5:302016-04-29T07:48:17+5:30

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील सर्व प्रवेशांसाठी संपूर्ण देशाच्या पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जावी

Medical admission 'Neat' | मेडिकल प्रवेश ‘नीट’नेच

मेडिकल प्रवेश ‘नीट’नेच

Next

नवी दिल्ली : सन २०१६-१७ या आगामी शैक्षणिक वर्षात देशभरातील खासगी तसेच सरकारी वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील सर्व प्रवेशांसाठी संपूर्ण देशाच्या पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. यासाठी घ्यायच्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट - एनईईटी - ‘नीट’) परीक्षेच्या वेळापत्रकासही न्यायालयाने मंजुरी दिली.
ही ‘नीट’ परीक्षा फक्त आंग्लवैद्यकाचा ‘एमबीबीएस’ पदवी अभ्यासक्रम व दंतवैद्यकाचा ‘बीडीएस’ पदवी अभ्यासक्रम यांच्याच प्रवेशासाठी असेल. याच वैद्यकशाखांचे पदव्युत्तर प्रवेश तसेच आयुर्वेद (बीएसएमएस), होमिओपथी (बीएचएमएस) आणि युनानी (बीयूएमएस) या अन्य वैद्यकशास्त्रांचे पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश या परीक्षेने होणार नाहीत. खरेतर, मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय) आणि डेंटल कौन्सिल आॅफ इंडियाने (डीसीआय) अशी देशव्यापी ‘नीट’ परीक्षा घेण्याची अधिसूचना सन २०१०मध्येच काढली होती. काही खासगी वैद्यकीय महाविद्यालये (पान १२ वर)(पान १ वरून) व काही राज्य सरकारांनी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आधी स्थगिती दिल्याने व २०१३ मध्ये ही अधिसूचना बेकायदा ठरवून रद्द केल्याने ही परीक्षा प्रत्यक्षात झाली नव्हती. मात्र यंदाच्या ११ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने २०१३ मधील निकाल मागे घेतला. परिणामी ‘नीट’ परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला.
तरीही केंद्र सरकारने यंदाच्या वर्षी ‘नीट’ परीक्षा घेण्याच्या काही हालचाली केल्या नाहीत. म्हणून आगामी वर्षाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा घेण्याचा आदेश मिळविण्यासाठी संकल्प चॅरिटेबल ट्रस्टने रिट याचिका केली.
ही याचिका न्या. अनिल आर. दवे, न्या. शिव किर्ती सिंग व न्या. आदर्श कुमार गोयल यांच्या खंडपीठापुढे बुधवारी प्रथम सुनावणीस आली तेव्हा केंद्र सरकार, मेडिक कौन्सिल व या परीक्षेचे आयोजन करणारे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) या तिन्ही प्रतिवादींनी ‘नीट’ परीक्षा यंदा घेणे शक्य आहे व तशी ती घेण्याची आमची तयारी आहे, असे आश्वासन दिले.
त्यानुसार परीक्षेचे निश्चित वेळापत्रक सादर करावे, असे न्यायालयाने सांगितले होते. (विशेष प्रतिनिधी)
वैद्यकीय प्रवेशांचे वेळापत्रक
‘नीट’ परीक्षा व त्यानुसार करायचे वैद्यकीय प्रवेश यासाठी न्यायालयाने मंजूर केलेले वेळापत्रक असे...
‘सीबीएसई’तर्फे येत्या रविवारी १ मे रोजी घेतली जाणारी अखिल भारतीय वैद्यकपूर्व प्रवेशपरीक्षा (एआयपीएमटी) हा वर्ष २०१६च्या ‘नीट’ परीक्षेचा पहिला टप्पा मानला जाईल.
आता ऐनवेळी निर्णय झाल्यामुळे ज्यांना
१ मेची परीक्षा देता येणार नाही त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे अर्ज मागवून २४ जुलै रोजी ‘नीट’ परीक्षेचा दुसरा टप्पा घेतला जाईल.
दि. १ मेची ‘एआयपीएमटी’ व २४ जुलैची
‘नीट’ या दोन्ही परीक्षांचा एकत्रित निकाल
१७ आॅगस्ट रोजी जाहीर केला जाईल.
या निकालानुसार ‘सीबीएसई’ संपूर्ण देशाच्या पातळीवरील गुणवत्ता यादी जाहीर करेल.
राज्यांमधील प्रवेश देणारे सक्षम प्राधिकारी या गुणवत्ता यादीनुसार १७ आॅगस्टपासून पुढील
४५ दिवस समुपदेशनाच्या फेऱ्या (कौन्सिलिंग राऊण्ड््स) घेऊन प्रवेश देतील.
३० सप्टेंबरपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल.
असे आहेत निर्देश
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी ‘नीट’ परीक्षेचे वेळापत्रक व अन्य तपशिल गुरुवारी दुपारी सादर केला. खंडपीठाने ते वेळापत्रक मंजूर केले व त्यानुसार ‘नीट’ परीक्षा घेतली जावी, असा आदेश दिला.
केंद्र सरकार, राज्य सरकारे, शिक्षणसंस्था व पोलीस यंत्रणा यासह इतर सर्व संबंधितांनी सुरक्षेचे आवश्यक ते उपाय करून व इलेक्ट्रॉनिक आणि दळणवळण साधनांसाठी जॅमर वापरून ‘नीट’ परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार सुरळितपणे पार पाडण्यात ‘सीबीएसई’ला मदत करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले.
>काही भले,
काही बुरे परिणाम

यामुळे खासगी महाविद्यालयांनी स्वत:च प्रवेश परीक्षा घेऊन त्यानुसार दिले जाणारे प्रवेश व त्यात होणारे नानाविध गैरप्रकार यांना चाप बसेल. प्रवेशासाठी तीन-चार प्रवेश परीक्षा देण्याच्या कमालीच्या तणावपूर्ण अनिश्तिततेतून विद्यार्थ्यांची सुटका होईल. पण त्याच बरोबर प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक जागेसाठी पर्त्येक प्रवेशेच्छु विद्यार्थ्यास देशातील प्रत्येक अन्य प्रवेशेच्छुशी स्पर्धा करावी लागेल. परिणामी आपल्या गुणवत्ताक्रमानुसार विद्यार्थांना देशाच्या कोणत्याही भागात जाऊन शिकण्याची तयारी ठेवावी लागेल. देशभरात एमबीबीएसच्या सुमारे ५२ हजार व बीडीएसच्या सुमारे १५ हजार जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी सुमारे ६.५ लाख विद्यार्थ्यांमध्ये ‘नीट’ परीक्षेच्या रूपाने स्पर्धा होईल, अशी अपेक्षा आहे.
>विद्यार्थ्यांची पंचाईत
व अनिश्चितता

१‘नीट’ परीक्षा व त्यानुसार प्रवेश देणे यामुळे विद्यार्थ्यांची मोठी पंचाईत होईल व वैद्यकीय प्रवेश मिळेल की नाही याविषयीच्या त्यांच्या अनिश्चिततेत भर पडेल. सध्या खासगी महाविद्यालयांची संघटना व अभिमत विद्यापीठे यांच्याखेरीज राज्य सरकार वैद्यकीय प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा घेते.
२राज्य सरकारची ‘एमएच-सीईटी’ एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस व बीडीएस या सर्व अभ्यासक्रमांसाठी सामायिक असते. गुणवत्ता यादी ठरल्यावर प्रथम एमबीबीएसचे प्रवेश होतात व नंतर इतर वैद्यकशाखांचे प्रवेश होतात.
३त्यामुळे विद्यार्थ्यांना एमबीबीएसला नाही तरी अन्य वैद्यकशाखेत प्रवेश
मिळण्याची बऱ्यापैकी शाश्वती असते. आता विद्यार्थ्यांना असा ‘चान्स’ घेण्यासाठी केंद्राची ‘नीट’ व राज्याची ‘सीईटी’ अशा दोन्ही परीक्षा द्याव्या लागतील.

Web Title: Medical admission 'Neat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.