आयआयटी, आयआयएममध्ये सुरू होणार वैद्यकीय अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 04:39 AM2018-07-26T04:39:31+5:302018-07-26T04:39:38+5:30
आयआयटी दिल्ली व व्यवस्थापन अभ्यासक्रमातील अग्रगण्य आयआयएम अहमदाबाद प्रथमच वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणार आहेत.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : आयआयटी दिल्ली व व्यवस्थापन अभ्यासक्रमातील अग्रगण्य आयआयएम अहमदाबाद प्रथमच वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. हा अभ्यासक्रम एमबीबीएस किंवा एमडी स्तरावरील नसून वैद्यकीय क्षेत्रातील उन्नत तंत्रज्ञान व सुधारित व्यवस्थापनावर आधारित असेल.
आयआयटी दिल्ली यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेशी (एम्स) करार करणार आहे तर आयआयएम अहमदाबाद जिंदाल स्टीलशी मिळून स्कूल आॅफ पब्लिक पॉलिसीची स्थापना करणार आहे. हेल्थ केअर बाजार लक्षात घेऊन यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा विकसित केले जाईल. आयआयटी दिल्लीचे उपसंचालक (स्ट्रॅटजी अँड प्लॅनिंग) प्रो. एम. बालाकृष्णन यांनी सांगितले की, हरियाणामधील झज्जर येथे बायो पार्क तयार केले जाईल. येथे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक प्रकारचे संशोधन केले जाईल.
> नवीन तंत्रज्ञानही गरजेचे
आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो. रामगोपाल राओ यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केवळ देशात नाही, तर विदेशातही वैद्यकीय क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. नव्या आजारांवरील उपचारासाठी औषधांसमवेत नवीन तंत्रज्ञानही गरजेचे आहे. या गरजा लक्षात घेऊन प्रथमच आयआयटी दिल्ली डिपार्टमेंट आॅफ बायोकेमिकल इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजीअंतर्गत नवे अभ्यासक्रम सुरू करीत आहे.