लस घेतल्यानंतरही मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा कोरोनामुळे मृत्यू
By महेश गलांडे | Published: March 3, 2021 11:30 AM2021-03-03T11:30:05+5:302021-03-03T11:31:46+5:30
शुभेंदू यांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोनाची लस घेतली होती. मात्र, त्यानंतरही 25 फेब्रुवारी रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला.
पटना - नालंदा मेडिकल कॉलेजच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याने कोरोना लसीचा कोव्हॅक्सीनचा पहिला डोसही घेतला होता. शुभेंदू सुमन (23) असे मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून बेगुसराय येथे त्याचा मृत्यू झाला. शुभेंदूने 22 दिवसांपूर्वीच कोरोनाची लस टोचून घेतली होती. त्यामुळे, आता महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
शुभेंदू यांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोनाची लस घेतली होती. मात्र, त्यानंतरही 25 फेब्रुवारी रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे ते आपल्या गावी बेगुसराय येथे गेले, त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णालयात आत्तापर्यंत 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यापैकी अनेकांनी कोव्हॅक्सीन लस घेतली आहे.
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात लक्षावधी हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्संना लस देण्यात आली. आरोग्य विभागातील कोरोना योद्ध्यांना प्रधान्याने लस देण्यात आली. त्यानंतर, 1 मार्चपासून कोव्हॅक्सीन ड्राइव्हचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामध्ये, 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पण गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी कृषीमंत्री शरद पवार, आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही लस घेतली आहे..