औषधांना न जुमानणारा हिवतापाचा विषाणू
By admin | Published: October 25, 2015 03:52 AM2015-10-25T03:52:53+5:302015-10-25T03:52:53+5:30
भारतात डेंग्यू या रोगाच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले असतानाच आग्नेय आशियात औषधींना न जुमानणाऱ्या हिवतापाच्या विषाणूचा प्रसार झाला आहे.
नवी दिल्ली : भारतात डेंग्यू या रोगाच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले असतानाच आग्नेय आशियात औषधींना न जुमानणाऱ्या हिवतापाच्या विषाणूचा प्रसार झाला आहे. त्यामुळे औषधी विज्ञानासमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे.
आग्नेय आशियात उद्भवलेला हा औषधी प्रतिरोधक विषाणू दक्षिण आफ्रिकेतील डासांनाही संक्रमित करू शकतो, असे एका संशोधनात आढळले आहे. अर्थात हा अभ्यास प्रयोगशाळेत करण्यात आला असून, या विषाणूचा जीवघेणा प्रसार प्रयोगशाळेच्या बाहेरही होऊ शकतो.
तसे झाल्यास या विषाणूचे भयंकर परिणाम होऊ शकतात आणि लाखो लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन’ मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅलर्जी अँड इन्फोक्शियस डिसीज’ने (एनआयएआयडी) यावर संशोधन केले आहे. या संस्थेतील एक डॉक्टर रिक फेयरहर्स्ट म्हणाले की, आग्नेय आशियात हिवतापाचे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना हे संशोधन फायद्याचे होईल.
अर्थात असे होण्याची ही पहिलीच वेळ नाही. १९५० च्या दशकापासून आतापर्यंत वेळोवेळी नवीन औषधी विकसित करण्यात आली. या औषधीने या विषाणूंना रोखले होते. यावेळी नवीन विषाणू थायलंड-कंबोडिया सीमेवर जन्माला आला आणि जगभर त्याचा प्रसार झाला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते गेल्या १५ वर्षांत हिवतापाचे बळी जाणाऱ्यांची संख्या ६० टक्क्यांनी घटली असून, ६२ लाख रोग्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)