औषध बनावट आहे की अस्सल? QR कोड एका झटक्यात सांगणार, पाहा नवा नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 03:03 PM2023-08-01T15:03:51+5:302023-08-01T15:04:48+5:30
आजपासून लागू होणार हा महत्त्वाचा नियम
QR code on Medicine: देशातील वाढत्या बनावट औषध निर्मितीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने औषधांवर क्यूआर कोड लावण्याचे आदेश जारी केले आहेत. ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने 1 ऑगस्ट 2023 पासून 300 फार्मा कंपन्यांना QR कोड स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार, देशातील टॉप 300 ड्रग ब्रँड्सना त्यांच्या औषधांवर QR कोड लावावा लागणार आहे. DGCI च्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल औषध कंपनीला दंड भरावा लागणार आहे.
कोणत्या औषधांना QR कोड असेल?
देशातील टॉप फार्मा कंपन्या आजपासून त्यांच्या औषधांवर QR कोड टाकणार आहेत. यामध्ये अॅलेग्रा, शेलकल, कॅल्पोल, डोलो आणि मेफ्टल या औषधांचा समावेश आहे. या आदेशाची पूर्तता न करणाऱ्या कोणत्याही कंपनीला दंड आकारला जाईल, असे ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने म्हटले आहे. केंद्र सरकारने एकूण 300 औषधांवर क्यूआर कोड बसवण्याचे आदेश दिले गेले आहेत.
QR कोडचा काय फायदा होईल?
क्यूआर कोड स्कॅन करून, ग्राहक औषधाशी संबंधित मूलभूत माहिती मिळवू शकतो. युनिक प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन कोड औषधाचे जेनेरिक नाव, ब्रँडचे नाव, उत्पादकाचे नाव, औषधाच्या उत्पादनाची तारीख आणि त्याची एक्सपायरी तारीख आणि औषध तयार करणाऱ्या कंपनीचा परवाना क्रमांक ओळखेल.
केंद्राने असा निर्णय का घेतला?
देशातील वाढत्या बनावट औषधांचा व्यवसाय रोखण्यासाठी सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये केंद्र सरकारने सांगितले होते की ते औषधांवर QR कोड लागू करण्याच्या प्रक्रियेत आहे. अलीकडेच यासंबंधी एक अधिसूचना जारी करून सांगण्यात आले की 1 ऑगस्ट 2023 पासून देशातील आघाडीची फार्मा कंपनी आपल्या औषधांवर QR कोड टाकणार आहे. यासाठी, औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायदा 1940 मध्ये सुधारणा करून सरकारने QR कोड बसवणे अनिवार्य केले आहे.