Medicines Price Hike: कळ सोसा! इंधनानंतर आता औषधेही महागणार; पॅरासिटेमॉलसह ८०० मेडिसिनच्या दरवाढीला केंद्राची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 10:07 AM2022-03-27T10:07:42+5:302022-03-27T10:08:10+5:30
Essential Medicines Price Hike: ताप, उच्च रक्त दाब, हृदयरोग, त्वचा रोग अॅनिमिया सारख्या आजारांवर उपचारासाठी उपयुक्त असलेल्या औषधांचा समावेश आहे.
वाढती महागाई लवकरच आक्राळविक्राळ रुप घेणार आहे. इंधनाचे दर वाढत चालले असून खाद्यतेल, गॅस, अन्न धान्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. असे असताना करोडो लोकांचे आजारपण सुसह्य करणाऱी औषधेही महागणार आहेत. पॅरासिटेमॉलसह ८०० हून अधिक औषधांच्या किंमती येत्या एप्रिलपासून वाढणार असून आता जास्त पैसे खर्च करावे लागमार आहे. (Medicines Price Hike)
औषधांच्या किंमतीमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. यामध्ये ताप, उच्च रक्त दाब, हृदयरोग, त्वचा रोग अॅनिमिया सारख्या आजारांवर उपचारासाठी उपयुक्त असलेल्या औषधांचा समावेश आहे. पॅरासिटेमॉल (Paracetamol) सारख्या सर्वाधिक वापराच्या औषधांच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. एप्रिलपासून पेनकिलर आणि अँटी बायोटीक औषधांच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे.
या औषधांच्या किंमतीत वाढ करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. नॅशनल फार्मा प्रायजिंग ऑथरिटीनुसार घाऊक महागाई दराच्या (WPI) आधारावर औषधांच्या किमती वाढवल्या जातील. NPPA ने शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत 10.7 टक्के वाढ करण्याची परवानगी दिली आहे. फार्मा कंपन्या कोविड-19 महामारीपासून औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत आहेत.
शेड्यूल औषधांमध्ये आवश्यक औषधांचा समावेश होतो. त्यात अशी औषधे आहेत ज्यांच्या किमती फार्मास्युटिकल कंपन्या स्वतः वाढवू शकत नाहीत. या औषधांच्या किमती वाढवण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. यामध्ये मध्यम ते गंभीर लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरत असलेल्या औषधांचाही समावेश आहे.
कोरोना विषाणूच्या साथीपासून फार्मा उद्योग शेड्यूल औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये, एक हजाराहून अधिक भारतीय औषध निर्मात्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लॉबीने सरकारला सर्व निश्चित फॉर्म्युलेशनच्या किमती 10 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती. याशिवाय शेड्यूल नसलेल्या औषधांच्या किमती 20 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.