मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा तुपाशी, महाराष्ट्र उपाशी; राज्य शासनाकडून सिंचनाचे नियोजनच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:21 PM2022-04-19T12:21:46+5:302022-04-19T12:22:23+5:30

तब्बल ८५ गेट असलेला हा मेडीगड्डा बॅरेज तेलंगणा सरकारने अवघ्या तीन ते साडेतीन वर्षांत बांधून पूर्ण केला. या भल्या मोठ्या प्रकल्पाचे पाणी थेट हैदराबादपर्यंत नेले जात आहे.

Medigadda Barrage Profitable for the in Telangana, There is no irrigation planning from the Maharashtra state government | मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा तुपाशी, महाराष्ट्र उपाशी; राज्य शासनाकडून सिंचनाचे नियोजनच नाही

मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणा तुपाशी, महाराष्ट्र उपाशी; राज्य शासनाकडून सिंचनाचे नियोजनच नाही

googlenewsNext

गडचिरोली : तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवरील गोदावरी नदीवर तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या महत्त्वाकांक्षी मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणातील लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. या पाण्यातून वर्षाकाठी तीन पिके घेऊन त्या भागातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् होत आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या हद्दीतील शेतकऱ्यांना एकही थेंब पाणी सिंचनासाठी घेण्याचे नियोजन राज्य सरकारने केले नसल्यामुळे हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यासाठी ‘पांढरा हत्ती’ ठरत आहे.

तब्बल ८५ गेट असलेला हा मेडीगड्डा बॅरेज तेलंगणा सरकारने अवघ्या तीन ते साडेतीन वर्षांत बांधून पूर्ण केला. या भल्या मोठ्या प्रकल्पाचे पाणी थेट हैदराबादपर्यंत नेले जात आहे. तेलंगणातील लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. या बॅरेजच्या बुडीत क्षेत्रात महाराष्ट्राच्या हद्दीतील १५ पेक्षा अधिक गावे आली आहेत. पावसाळ्यात बॅरेजचे गेट उघडले जातात, त्यावेळी सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरून पिके व सुपीक माती खरडून निघते, याशिवाय पाणी अडविणे सुरू होते. त्यावेळी गोदावरी आणि प्राणहिता नदीचे बॅकवॉटरही शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरते. गोदावरी आणि प्राणहिता नद्यांवर उपसा सिंचन योजना उभारल्यास लाभ होऊ शकतो. 

दरम्यान, पुष्कर मेळ्याच्या निमित्ताने सिरोंचात गेलेले गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांचे काही शेतकऱ्यांनी याकडे लक्ष वेधले. त्यामुळे त्यांनी बॅरेजला भेट देऊन प्रकल्पाचे मुख्य अभियंता विश्वकर्मालू, तिरुपती राव, उपअभियंता रवि जलसा यांच्यासोबत चर्चा करून राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.

विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणार
वनकायद्याची अडचण पुढे करत शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवणे योग्य नाही. राज्य सरकारने रमेशगुडम, पेंटीपाका, झिंगानूर येथे उपसा सिंचन प्रकल्प उभारल्यास गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही त्या पाण्याचा फायदा होईल. या संदर्भात जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करणार असून, विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असे आ.डॉ.देवराव होळी म्हणाले.
 

Web Title: Medigadda Barrage Profitable for the in Telangana, There is no irrigation planning from the Maharashtra state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.