ध्यानधारणेमुळे रोखल्या जाऊ शकतात आत्महत्या, राष्ट्रीय मोहिमेचा दुसरा ऑनलाइन राष्ट्रीय संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 10:17 AM2023-09-11T10:17:31+5:302023-09-11T10:18:50+5:30
आत्महत्येची प्रवृत्ती रोखण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून ध्यानधारणेचा सराव खूप प्रभावी आहे, असे मत महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर भुवनेश शर्मा यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली - आत्महत्येची प्रवृत्ती रोखण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून ध्यानधारणेचा सराव खूप प्रभावी आहे, असे मत महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर भुवनेश शर्मा यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्या रोखण्यासाठी आणि कायदेशीर सुरक्षा उपायांसाठी सुरू असलेल्या राष्ट्रीय मोहिमेचा एक भाग म्हणून शनिवारी दुसऱ्या ऑनलाइन राष्ट्रीय संवादाचे आयोजन करण्यात आले होते. येथे इंडियन फोरम ऑफ एज्युकेटर्सच्या अध्यक्षा डॉ. सुनीता सिंह यांनी शैक्षणिक व्यवस्थेतील आरोग्य आणि कायदेशीर संरक्षण याबाबत माहिती दिली.
ग्लोबल वेलनेस फोरम आणि इंडियन फोरम ऑफ एज्युकेटर्सचे संस्थापक, मोहिमेचे आयोजक डॉ. सुरेंद्र दास यांनी एका कृती आराखड्याचे अनावरण केले. जो शैक्षणिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्य आणि कायदेशीर उपायांसाठी रोडमॅप म्हणून काम करेल. ‘लोकमत’ या मोहिमेचा मीडिया पार्टनर आहे.
‘टॉक थेरपी’ उपयुक्त
इंदूर येथील प्रेस्टिज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे डीन डॉ. राजा रॉय चौधरी यांनी संभाव्य धोके ओळखणे आणि सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
मजबूत टीमवर्कच्या महत्त्वावर भर
ग्लोबल वेलनेस फोरम, नागपूरच्या कोअर टीम सदस्य डॉ. मंजू जैन यांनी सर्व भागधारकांमध्ये मजबूत टीमवर्कच्या महत्त्वावर भर दिला. हा उपक्रम पुढे नेण्यासाठी असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह स्कूल ऑफ आग्राचे अध्यक्ष डॉ. सुशील गुप्ता यांना राष्ट्रीय समन्वयक म्हणून घोषित करण्यात आले. सल्लागारांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती दिल्ली येथील मानसशास्त्रज्ञ अजय जैन, वर्धा येथील डॉ. रुपाली सरोदे, हैदराबाद येथील डॉ. उजमा कमर, नवी दिल्ली येथील डॉ. कोमलप्रीत कौर, वापी, गुजरात येथील लावण्य पटेल आणि भोपाळ येथील शिखा छिब्बर यांनी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर भर दिला.
मुलांच्या क्षमता ओळखा
लोकमत समाचारचे सीनियर एडिटर विकास मिश्र यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रेरणादायी घटना शेअर करण्यावर भर दिला. पालकांनी आपल्या मुलांच्या क्षमता ओळखाव्यात आणि त्यांच्यासाठी नसलेल्या गोष्टीत त्यांना ढकलू नये, असे आवाहन केले. डीसीएम ग्रुप ऑफ स्कूल, पंजाब येथील सीईओ डॉ. अनिरुद्ध गुप्ता यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील खुल्या संवादाला मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून प्रोत्साहित केले.
यूएसडब्ल्यूएएनच्या अध्यक्षा नीरू कपाई म्हणाल्या की, जीवन जगण्यासाठी आहे आणि आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. सीबीएसई स्कूल मॅनेजर्स असोसिएशनचे प्रवक्ते मुरलीधर यादव यांनी मुलांच्या मानसिक आरोग्यावर पालकांचा दबाव आणि अपेक्षांच्या परिणामांबद्दल जागरूकता वाढविण्याची गरज व्यक्त केली.