UP Assembly Election 2022: भाजपा नेता आणि कुस्तीपटू बबिता फोगाटच्या कारवर हल्ला, नेमकं काय घडलं? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 07:02 PM2022-02-05T19:02:55+5:302022-02-05T19:03:45+5:30
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना भाजपा नेता आणि कुस्तीपटू बबिता फोगाट (Babita Phogat) हिच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना भाजपा नेता आणि कुस्तीपटू बबिता फोगाट (Babita Phogat) हिच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. एनएआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मेरठ येथे निवडणूक प्रचार करत असताना बबिताच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केला. सुदैवानं बबिताला यात कोणतीही दुखापत झालेली नाही. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मेरठच्या सिवालखास विधानसभा मतदार संघात दबथुवा गावात ही घटना घडली आहे. बबिता फोगाट भाजपाच्या उमेदवार मनिंदर पाल सिंह यांच्या प्रचारासाठी गावात दाखल झाल्या होत्या. इतक्यात राष्ट्रीय लोक दलच्या (रालोद) समर्थकांनी लाठ्या-काठ्यांनी भाजपाविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी याचा विरोध केल्यानंतर 'रालोद'च्या समर्थकांनी हल्ला केला. यात भाजपाचे कार्यकर्ते जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 'रालोद'च्या समर्थकांनी महिलांसोबत अभद्र वागणूक केली आणि माझ्या गाडीवरही हल्ला केला, असा आरोप बबिता फोगाट यांनी केला आहे.
बबिता फोगाट काय म्हणाली?
गावात सपा आणि रालोदच्या कार्यकर्त्यांनी उद्धटपणा केला. यात अनेकांना मारहाण झाली आहे आणि एका महिलेचा पाय देखील तुटला आहे. तसंच अनेकांच्या डोक्याला दुखापत झाली आहे, असं बबिता फोगाट म्हणाली. यात आपल्या कारवरही रालोदच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं फोगाटनं म्हटलं आहे. या हल्ल्यानंतर मला रालोदच्या चौधरी अजित सिंह यांची आठवण झाली. 'ज्या गाडीवर सपाचा झेंडा, समजून जा गाडीत बसला आहे गुंडा', असं ते म्हणायचे. याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असं बबिता म्हणाली. तसंच आपल्या मुली आणि बहिणींना सुरक्षित वातावरण द्यायचं असेल तर जनतेनं भाजपाला मतदान करावं असं आवाहन बबितानं केलं आहे.